जिल्ह्यात योगपर्व
By Admin | Updated: June 21, 2015 23:02 IST2015-06-21T23:02:32+5:302015-06-21T23:02:32+5:30
रायगड जिल्ह्यातील ३ हजार ८१७ शाळेतील सुमारे पाच लाख विद्यार्थी आणि दोन हजार शिक्षकांनी शनिवारी सकाळी विविध योगासने करून

जिल्ह्यात योगपर्व
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ३ हजार ८१७ शाळेतील सुमारे पाच लाख विद्यार्थी आणि दोन हजार शिक्षकांनी शनिवारी सकाळी विविध योगासने करून पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. जिल्ह्यात सकाळी पावसाचा जोर कायम असल्याने शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये योग प्रशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योगाभ्यासाचे धडे गिरविले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्हा परिषदेच्या २ हजार ८३७ शाळा, नगर पालिकेच्या ८५, खासगी अनुदानित ३९०, खासगी विनाअनुदानित ४८४, राज्य आणि केंद्र सरकारच्या २१ शाळांमध्ये सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांची संख्या आहे. शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून ३५ मिनिटांचा योगाभ्यास केल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांनी दिली. यावेळी योगाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतलेल्या सुमारे दोन हजार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगासनाची पाच आसने शिकवली. पावसाचा व्यत्यय आल्याने शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे शिक्षण देण्यात आल्याचे बडे यांनी सांगितले.