Join us
Daily Top 2Weekly Top 5

योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर उद्योजक, गुंतवणूकदारांशी साधणार संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 04:29 IST

योगी आदित्यनाथ विशेष विमानाने मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. उत्तर प्रदेशमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी आणि तेथे रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी योगी आदित्यनाथ जोरदार प्रयत्न करीत आहेत.  

मुंबई : राज्यातील गुंतवणूक वाढावी, प्रस्तावित फिल्म सिटी मार्गी लावण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आपल्या या दौऱ्यात योगी विविध उद्योजक, औद्यागिक कंपन्यांचे प्रतिनिधी, सिने तारेतारकांच्या भेटी घेणार आहेत. 

योगी आदित्यनाथ विशेष विमानाने मंगळवारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले. उत्तर प्रदेशमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी आणि तेथे रोजगारनिर्मिती व्हावी यासाठी योगी आदित्यनाथ जोरदार प्रयत्न करीत आहेत.  त्यादृष्टीने बुधवारी, दिवसभर भरगच्च कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. सकाळी, मुंबई स्टाॅक एक्सचेंजमध्ये लखनऊ मनपाच्या बाँडचे अधिकृत लिस्टींगमध्ये सहभागी होणार आहेत. लखनऊ महापालिकेने याच महिन्यात दोनशे कोटींचे बॉन्ड जारी केले होते. लखनऊ मनपाची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वी देशातील अन्य दहा महापालिकांनी बॉन्ड जारी केले होते. यानंतर योगी आदित्यनाथ हे हाॅटेल ट्रायडंट येथे विविध उद्योजकांशी संवाद साधणार आहे. उत्तर प्रदेशात सत्ता आल्यानंतर भाजपने २०१८ साली इन्वेस्टर्स फ्रेंडली हब म्हणून विकास करण्याचे जाहिर केले होते. 

कत्या अनुषंगाने संरक्षण विषय काँरिडोअरसाठी गुंतवणूकदार,  प्रस्तावित फिल्म सिटीतील गुंतवणुकदारांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय. मुख्यमंत्री योगी विविध उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. 

या मान्यवरांशी करणार चर्चा टाटा सन्सचे एन. चंद्रशेखर, हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, सिमन्सचे सुप्रकाश चौधरी, 'एल अँड टी'चे एस.एन. सुब्रह्ममनियन, कॅपिटल सर्व्हिसेसचे विकास जैन, याशिवाय संजय नायर, जसपाल बिंद्रा, सुकरन सिंह, अशा औद्यागिक संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. तसेच चित्रपट सृष्टीतील सुभाष घई, बोनी कपूर, भूषण कुमार, जतिन सेठी, राहुल मित्रा, नीरज पाठक, रणदीप हुडा, जिमी शेरगील, तरन आदर्श कोमल नहाटा, राजकुमार संतोषी आदी मान्यवरांना भेटणार आहेत.

 

टॅग्स :योगी आदित्यनाथ