होय, आम्ही ISIS साठी लढतोय - कल्याणच्या बेपत्ता युवकांची पालकांकडे कबुली
By Admin | Updated: July 26, 2014 10:32 IST2014-07-26T09:55:45+5:302014-07-26T10:32:17+5:30
कल्याणमधील चार तरूण 'आयएसआयएस' या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी बनल्याची शक्यता व्यक्त होत असतानाच दोन तरूणांनी पालकांना फोन करून आपण आयएसआयएससाठी काम करत असल्याची कबुली दिली आहे.

होय, आम्ही ISIS साठी लढतोय - कल्याणच्या बेपत्ता युवकांची पालकांकडे कबुली
>ऑनलाइन टीम
कल्याण, दि. २६ - कल्याणमधील चार तरूण 'आयएसआयएस' या दहशतवादी संघटनेचे अतिरेकी बनल्याची शक्यता व्यक्त होत असतानाचा, त्यापैकी दोन तरूणांनी आपल्या पालकांकडे 'आपण आयएसआयएस'चे सदस्य म्हणून काम करत असल्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे. काही अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरूणांनी या आठवड्याच्या सुरूवातीला त्यांच्या पालकांशी फोनद्वारे संपर्क साधला व आपण या सीरियातील रक्का प्रांतात या संघनेसाठी काम करत आहोत, असे सांगितल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.
कल्याणमध्ये रेतीबंदर परिसरात राहणारे चार तरूण गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होते. ते चौघेही इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
या चौघांपैकी आरिफ माजिद आणि सलीम तन्की या दोघांनी कुटुंबियांशी बातचीत करून आपण सुरक्षित असल्याचे कळवले, तसेच आपण 'आयएसआयएस'साठी जे काम करतोय त्यामुळे आपले सर्व कुटुंब 'जन्नत'मध्ये जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच कल्याणमधून बेपत्ता झालेले आणखी दोन तरूण अमन तांडेल व फहाद शेख हेही सुरक्षित असून तेही या संघटनेसाठीच काम करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. आम्ही चौघेही एकाच प्रातांत मात्र दोन वेगळ्या गटात राहतो, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, असा कोणताही फोन आला नव्हता असे सांगत आरिफच्या कुटुंबियांनी हे वृत्त फेटाळले आहे, तर सलीमच्या कुटुंबियांशी संपर्क होऊ शकला नाही, मात्र असे असले तरीही त्यांनी दहशतवादविरोधी पथक व राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.
नवी मुंबईतील एका कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंग करणा-या आरिफने त्याच्या डॉक्टर वडिलांशी संपर्क साधला. त्याच्या वडिलांनी त्याला परत येण्यास सांगितले असता त्याने त्यांना नकार देत कुटुंबीय मात्र त्याच्या भेटीसाठी सीरियामध्ये येऊ शकतात असे सांगितल्याचे समजते. तर एका कॉल सेंटरमध्ये काम करणा-या सलीमनेही पालकांशी संपर्क साधत आपण सुरक्षित असल्याचे सांगितले.
हे तरूण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या पालकांनी कल्याणमधील बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. हे चौघेही ३० भाविकांसोबत इराक येथे गेले होते, मात्र भारतात परत येण्याच्या एक दिवस आधीच ते गायब झाले. त्या चौघांना 'मौसुल' येथे सोडल्याची माहिती एका टॅक्सी चालकाने शोधपथकातील अधिका-यांना दिली होती. हा भाग त्यानंतर काही दिवसांतच 'आयएसआयएस'च्या ताब्यात आला होता.
इराकला जाण्यापूर्वी आरिफ घरात एक पत्रही ठेवून गेला होता, अशी माहिती अधिका-यांनी दिली.