Join us  

होय...मी आजही इंद्राणी आणि पीटरला ओळखू शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 9:10 PM

मुंबई सत्र न्यायालयात सहआयुक्त देवेन भारती यांनी दिली साक्ष 

मुंबई - होय... मी इंद्राणी मुखर्जी आणि पीटरला आजही ओळखू शकतो, ते तिथे बसले आहेत. दोघांनीही २०१२ मध्ये एका हरविलेल्या नातेवाईकाला शोधण्याची विनंती मला केली होती. परंतू काही दिवसांनी ती व्यक्ती सापडली असून शोधकार्य थांबवा अशीही विनंती केली. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. ती व्यक्ती शीना बोरा असल्याचे आपल्याला  २०१५ मध्ये खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर समजल्याचा दावा मुंबई पोलीस दलातील कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख सहआयुक्त देवेन भारती यांनी सोमवारी न्यायालयासमोर केला. बहूचर्चीत शीना बोरा हत्याकांडाप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यामध्ये साक्षीदार म्हणून भारती न्यायालयात हजर झाले होते.

विदेशी नागरीक नोंदणी कार्यालयात (एफआरआरओ) २००२ ते २००७ या काळात माझी नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी इंद्राणी आणि पीटर पासपोर्ट, तसेच व्हीसाची मुदत वाढविण्यासाठी कार्यालयात येत होते. त्यामुळे त्यांच्याशी ओळख झाली होती. २०१२ मध्ये माझी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा एप्रिल महिन्यात पीटर आणि इंद्राणी त्यांच्या एका हरविलेल्या नातेवाईकचे मोबाईल टॉवर लोकेशन शोधण्यासाठी माझ्या कार्यालयात आले होते. दोघांनीही विनंती केल्यानंतर मी अलखनुरे नावाच्या अधिकार्‍याला त्या मोबाईलचे टॉवर लोकेशन शोधण्यास सांगितले. 

अलकनुरे यांनी केलेल्या तपासानंतर इंद्राणी आणि पीटरला त्या मोबाईलच्या लोकेशन बाबत आमच्याकडून माहीती देण्यात आली. त्यानंतर काही दिवसांनी इंद्राणी आणि पीटरने ती हरविलेली व्यक्ती सापडल्याची माहिती मला देत तपास थांबविण्याची विनंती केली. त्यानुसार अलकनुरे यांना मी तपास थांबवायला सांगितला. २०१५ मध्ये जेव्हा मी खार पोलीस ठाण्यात गेलो. तेव्हा शीना बोरा हत्याकांडातील तो मोबाईल नंबर इंद्राणी आणि पिटरने माझ्याकडे त्यावेळी लोकेशन शोधण्यासाठी दिल्याचे समजले. खार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये तपासासाठी अन्य अधिकार्‍यांसोबत चार ते पाच वेळा गेलो होतो. याप्रकरणात २८ ऑक्टोबर २०१५ आणि २६ नोव्हेंबर २०१५ या दोन दिवशी मी शीना बोरा हत्येप्रकरणी साक्षिदार म्हणून जबाब नोंदविले आहेत. यात पीटर आणि इंद्राणीला त्यांच्या कुटूंबातील हरविलेल्या व्यक्तीचे मोबाईल लोकेशन शोधण्यासाठी मदत केली होती, अशी कबुली दिल्याचे भारती यांनी न्यायालयाला सांगितले. 

टॅग्स :मुंबईन्यायालयगुन्हा