Join us  

येस बँक घोटाळा; राणा कपूरची रवानगी न्यायालयीन कोठडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:18 AM

राणा कपूर याला या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती.

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, त्याला कारागृहात कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याची भीती त्याच्या वकिलांनी विशेष न्यायालयात व्यक्त केली.राणा कपूर याला या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. त्याची ईडी कोठडी शुक्रवारी संपल्याने त्याला न्यायालयात हजर केले. ईडीने त्याचा ताबा न मागितल्याने विशेष न्यायालयाने त्याला २ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. राणा ६२ वर्षांचा आहे आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे. अशा व्यक्तीला सहजच कोरोना होऊ शकेल, असा युक्तिवाद राणा कपूरतर्फे ज्येष्ठ वकील आबाद पौडा यांनी न्यायालयात केला. राणा विषाणूच्या विळख्यात आला तर गंभीर परिस्थिती निर्माण होईल, असे पौडा म्हणाले.ईडीच्या म्हणण्यानुसार, राणा कपूर येस बँकेचे कामकाज सांभाळत असताना त्याने ३० हजार कोटी रुपये कर्ज दिले. त्यातील २० हजार कोटी रुपये बुडीत निघाले. सीबीआयही तपास करीत आहे. राणा कपूर याला सीबीआय कोर्टापुढे हजर करण्यासाठी सीबीआयने प्रोडक्शन वॉरंट मिळवल्याचे पौडा यांनी सांगितले.काळजी घेण्याचे निर्देशन्यायालयाने कारागृह प्रशासनाला राणाच्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले. तसेच डॉक्टरांनी सुचवलेली सर्व औषधे पुरविण्याचे निर्देशही कारागृह प्रशासनाला दिले. राणा विषाणूच्या विळख्यात आला तर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होईल,’ असे त्यांच्या वकिलांनी सांगितले होते.

टॅग्स :येस बँकन्यायालय