Join us

चिंचपोकळीच्या चिंतामणीची यंदा चांदीची मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 07:07 IST

मंडळाने कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ३ लाख ५१ हजार रुपयांची मदत केली आहे़

मुंबई : गणेशोत्सव काळात भक्तांचे आकर्षण असणारा चिंचपोकळीचा चिंतामणी यंदा चांदीच्या रूपात असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा मंडळाच्या देव्हाऱ्यात चांदीच्या गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा हे मंडळ १०१ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. मात्र या वर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. यंदा भव्य सजावट व रोषणाई यावर खर्च न करता जमा होणाºया वर्गणीतून शासकीय रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे, गरजूंकरिता रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याआधी लोकमान्य टिळकांच्या शताब्दी वर्ष पुण्यतिथीनिमित्त १ आॅगस्ट रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात एकूण १८८ रक्तदात्यांचे रक्त संकलित करण्यात आले. या वर्षी कोरोनाच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या १०१ कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. मंडळाने कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ३ लाख ५१ हजार रुपयांची मदत केली आहे़ उत्सव कालावधीत विभागातील वर्गणीदारांसाठी ठरावीक वेळेत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व भक्तांसाठी आॅनलाइन दर्शन उपलब्ध असल्याने भक्तांनी गर्दी न करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :गणेशोत्सव