Join us  

वर्षभराचे काम उरकले चार बैठकांमध्ये; आचारसंहितेपूर्वी कामाची लगबग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:34 AM

आचारसंहितेपूर्वी कामाची लगबग; २,४५० कोटींची विकासकामे मंजूर

मुंबई : आचारसंहितेचे काउंट डाउन सुरू होताच, महापालिकेमध्ये विकास कामांची लगबग सुरू झाली. मतदारांची गैरसोय दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींची धावपळ सुरू झाली. त्यात पहारेकऱ्यांबरोबर सूर जुळल्यामुळे रेंगाळलेल्या अनेक प्रकल्पांचा मार्गही मोकळा झाला आणि शेवटच्या टप्प्यात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने अवघ्या चार बैठकांमध्ये २,४५० कोटींच्या विकास कामांना झटपट मंजुरी दिली.महापालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समितीच्या मंजुरीनंतर महासभेत शिक्कामोर्तब होऊन विकास कामांचे कार्यादेश काढण्यात येतो. मात्र, स्थायी समितीची ही बैठक आठवड्यातून एकदाच होत असते. या बैठकीत प्रशासनाने मांडलेल्या नागरी सुविधा व प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा होऊन स्थायी समिती मंजुरी देत असते.मात्र, गेले काही महिने विविध कारणांमुळे रखडलेले विविध प्रस्ताव २८ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधी स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपुष्टात येत असल्याने, दरवर्षी मार्च महिन्यात कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूक असल्याने, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची धास्ती सत्ताधारी शिवसेनेला होती. यामुळे गेल्या आठवड्यात स्थायी समितीच्या दोन बैठका घेण्यात आल्या. यामध्ये मंजूर झालेल्या प्रस्तावांवर शिक्कामोर्तब होण्यासाठी शनिवारी सुट्टीच्या दिवशी महासभा बोलावून प्रस्ताव मंजूर करण्यात आले.असे आहेत मोठे प्रकल्प...रस्त्यांचे काँक्रिटीकरण, विलेपार्ले पूर्व येथील शास्त्रीनगर नाला व श्रद्धानंद नाल्याचे बांधकाम करणे, दादर पश्चिम येथील जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपुलाच्या खाली सुशोभीकरण, पाण्याची गळती रोखणे, पालिका शाळेची दुरुस्ती, आठ पुलांची दुरुस्ती, कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान, विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय परिसरात वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम, शाळांच्या सुरक्षा- स्वच्छता- देखभाल, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, मुलुंड येथे ३५० खाटांचे तर गोवंडीत ५८० खाटांचे रुग्णालय....निवडणुकीच्या प्रचारात होणार फायदा : नोकरदार महिलांसाठी गोरेगाव येथे पहिले वसतिगृह महापालिका बांधणार आहे. पूर्व उपनगरातील गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी मुलुंड आणि गोवंडी येथील पालिका रुग्णालय अद्ययावत करण्यात येत आहेत. त्याचबरोबर, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, शाळांची दुरुस्ती, पुलांच्या दुरुस्ती अशा विकास कामांना परवानगी मिळाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली, तरी या कामांचे कार्यादेश महापालिकेला देता येणार आहे. त्यामुळे ही विकास कामे करून दाखविल्याची जाहिरातबाजी सत्ताधाऱ्यांना करता येणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकालोकसभा निवडणूक २०१९भाजपाशिवसेना