यंदा पावसाळाही ‘वंडर’फुल
By Admin | Updated: May 12, 2015 03:29 IST2015-05-12T03:29:49+5:302015-05-12T03:29:49+5:30
नेरूळमधील वंडर्स पार्क या वर्षी पावसाळ्यातही सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येथील फूड कोर्टचे काम सुरू करण्यात आले आहे.

यंदा पावसाळाही ‘वंडर’फुल
नामदेव मोरे, नवी मुंबई
नेरूळमधील वंडर्स पार्क या वर्षी पावसाळ्यातही सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. येथील फूड कोर्टचे काम सुरू करण्यात आले आहे. नैसर्गिक तळ्याची दुरुस्तीही करण्यात येत असून मुलांसाठी दहा नवीन राइड्स सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.
नवी मुंबईमधील सर्वाधिक गर्दी होणाऱ्या उद्यानांमध्ये नेरूळ सेक्टर-१९ मधील वंडर्स पार्कचा समावेश आहे. उन्हाळ्याची सुटी सुरू झाल्यामुळे उद्यानामधील गर्दी वाढली आहे. सायंकाळी तिकिटासाठी रांगा लागत आहेत. उद्यानामध्ये प्रवेशासाठी मोठ्यांना ३५ रुपये व १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना २५ रुपये शुल्क आकारण्यात येते. प्रवेशशुल्काच्या प्रमाणामध्ये आतमध्ये सुविधा नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. येथील राइड्सचाही लोकांना कंटाळा आला आहे. फूड कोर्टही सुरू झाले नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह खाद्यपदार्थ बाहेरूनच आणावे लागत आहेत. येथील नैसर्गिक तळ्यांमधील पाणी उन्हाळ्यात आटते. कृत्रिम तलावाही अनेक वेळा कोरडे पडतात. आत ट्रॅफिक गार्डन तयार केले आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग केला जात नाही.
वंडर्स पार्कमधील या गैरसोयी दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. नैसर्गिक तळ्यांमध्ये शेततळ्यांच्या धर्तीवर लाइनर टाकण्यात येणार आहेत. दहा नवीन छोट्या राइड्स सुरू केल्या जाणार आहेत. आणखी एक टॉय ट्रेन सुरू केली जाणार आहे. याशिवाय ट्रॅफिकची माहिती देण्यासाठी खेळण्यातल्या कार व मोटारसायकल घेतल्या जाणार आहेत.
अत्याधुनिक फूड कोर्टचे काम सुरू करण्यात आले आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत ते सुरू होणार आहे. दोन वर्षे पावसाळ्यात वंडर्स पार्क बंद ठेवण्यात येत होते. परंतु या वर्षीपासून पावसाळ्यातही वंडर्स पार्क सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गैरसोयी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय देसाई यांनी दिली आहे.