Join us  

यशवंतराव चव्हाण पुरस्कारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 8:15 AM

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्यातील ३२ साहित्यिकांना विविध साहित्य प्रकारात हे पुरस्कार घोषित झाले असून लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

यात प्रौढ वाङ्मय पुरस्कार काव्य प्रकारात कवी केशवसूत पुरस्कार शशिकांत हिंगोणेकर यांना ‘ऋतूपर्व’ पुस्तकासाठी १ लाख रुपये, प्रथम प्रकाशन काव्य प्रकारात अमृत तेलंग यांच्या ‘पुन्हा फुटतो भादवा’ या पुस्तकासाठी ५० हजार रुपये, प्रौढ वाङ्मय नाटक/एकांकिका या प्रकारात आशुतोष पोतदार यांच्या ‘ऋ1/105 आणि सिंधू, ‘सुधाकर, रम आणि इतर’ पुस्तकास १ लाख रुपयांचा राम गणेश गडकरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर प्रौढ वाङ्मय कादंबरी प्रकारात कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीस १ लाख रुपयांचा हरी नारायण आपटे पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रथम प्रकाशन-कादंबरी प्रकारात रचना यांच्या ‘एका वाडीची गोष्ट’ या पुस्तकास ५० हजार रुपयांचा श्री.ना. पेंडसे पुरस्कार जाहीर झाला आहे. मधुकर धर्मापुरीकर यांना प्रौढ वाङ्मय-लघुकथा प्रकारात ‘झाली लिहून कथा?’ या पुस्तकास १ लाख रुपयांचा दिवाकर कृष्ण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. याप्रमाणेच, प्रथम प्रकाशन-लघुकथा प्रकारात अविनाश राजाराम यांच्या ‘सेकंड इनिंग’ या पुस्तकास ५० हजार रुपयांचा ग.ल. ठोकळ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रौढ वाङ्मय - ललितगद्य प्रकारात इरावती कर्णिक यांच्या ‘बाटलीतल्या राक्षशिणीचं मनोगत’ पुस्तकास १ लाख रुपयांचा अनंत काणेकर पुरस्कार घोषित झाला आहे. तर प्रथम प्रकाशन - ललितगद्य प्रकारात सुधीर महाबळ यांच्या ‘परतवारी’ पुस्तकास ५० हजार रुपयांचा ताराबाई शिंदे पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रौढ वाङ्मय चरित्र या साहित्यप्रकारात डॉ. उमेश करंबळेकर यांच्या ‘सजीवांचा नामदाता, कार्ल लिनिअस’ या पुस्तकास १ लाख रुपयांचा न.चिं. केळकर पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रौढ वाङ्मय - आत्मचरित्र प्रकारात वासुदेव मुलाटे यांच्या ‘झाकोळलेल्या वाटा’ पुस्तकाला १ लाख रुपयांचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रौढ वाङ्मय-समीक्षा, वाङ्मयीन संशोधन, सौंदर्यशास्त्र, आस्वादपर लेखन, ललितकला या प्रकारात प्रा. यशपाल भिंगे यांच्या ‘प्रत्ययाप्रति’ पुस्तकास १ लाख रुपयांचा के. क्षीरसागर पुरस्कार घोषित केला आहे. प्रौढ वाङ्मय राज्यशास्त्र/ समाजशास्त्र या प्रकारात अ‍ॅड. निशा शिवूरकर यांच्या ‘लढा टाकलेल्या स्त्रियांचा’ या पुस्तकास १ लाख रुपयांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. प्रौढ वाङ्मय - इतिहास या प्रकारात डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम’ पुस्तकास १ लाख रुपयांचा शाहू महाराज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर प्रौढ वाङ्मय - भाषाशास्त्र/ व्याकरण प्रकारात नरेश नाईक यांच्या ‘सामवेद बोली : संरचना आणि स्वरूप’ या पुस्तकास १ लाख रुपयांचा नरहर कुरुंदकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच, प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय प्रकारात डॉ. वर्षा गंगणे यांच्या ‘भारतीय कृषी क्षेत्र दशा आणि दिशा’ पुस्तकास १ लाख रुपयांचा वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झाला आहे. सुरेश कृष्णाजी पाटोळे यांच्या ‘पुळका’ या पुस्तकास १ लाख रुपयांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रौढ वाङ्मय - अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन प्रकारात डॉ. मृदुला बेळे यांच्या ‘कथा अकलेच्या कायद्याची’ पुस्तकास १ लाख रुपयांचा सी.डी. देशमुख पुरस्कार घोषित झाला आहे. प्रौढ वाङ्मय - तत्त्वज्ञान व मानसशास्त्र प्रकारात डॉ. उमा वैद्य यांच्या ‘योगवासिष्ठ आणि पंथीय तत्त्वज्ञान’ पुस्तकास १ लाख रुपयांचा ना.गो. नांदापूरकर पुरस्कार जाहीर झाला आहे. नामदेव माळी यांना प्रौढ वाङ्मय - शिक्षणशास्त्र प्रकारात ‘चला लिहू या’ पुस्तकास १ लाख रुपयांचा कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार घोषित झाला आहे. अर्जुन व्हटकर यांना प्रौढ वाङ्मय - पर्यावरण प्रकारात ‘मुक्या जंगलाची गर्जना’ पुस्तकास १ लाख रुपयांचा डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार जाहीर झाला आहे.तीन पुरस्कारांसाठी शिफारसच नाहीप्रथम प्रकाशन - नाटक/ एकांकिका प्रकारासाठी विजय तेंडुलकर पुरस्कार(५० हजार रुपये), प्रौढ वाङ्मय - विनोद प्रकारासाठी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार (१ लाख रुपये) आणि प्रथम प्रकाशन - समीक्षा सौंदर्यशास्त्र प्रकारासाठी रा. भा. पाटणकर पुरस्कार (५० हजार रुपये) या तिन्ही पुरस्कारांसाठी शिफारस आली नसल्याने हे पुरस्कार जाहीर केलेले नाहीत.

टॅग्स :यशवंतराव चव्हाणमुंबईमहाराष्ट्र