Join us  

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर; रवींद्र लाखे यांना ‘अवस्थांतराच्या कविता’साठी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 11:31 PM

उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई : उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य व राज्याबाहेरील मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती करणाºया लेखकांचा पुरस्काराने गौरव केला जातो. २०१८ या वर्षात प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०१८ जाहीर करण्यात आले आहेत.

या वर्षी प्रौैढ वाङ्मय काव्य विभागात कवी केशवसुत पुरस्कार रवींद्र लाखे यांना ‘अवस्थांतराच्या कविता’साठी जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये आहे. प्रथम प्रकाशन काव्य विभागात बहिणाबाई चौधरी पुरस्कार राही डहाके यांना ‘हजार रक्तवर्णी सूर्य’साठी जाहीर झाला आहे. याचे स्वरूप ५० हजार रुपये आहे.

प्रौढ वाङ्मय नाटक / एकांकिका राम गणेश गडकरी पुरस्कार अजित दळवी यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ला जाहीर झाला आहे. याचे स्वरूप १ लाख रुपये आहे. तर प्रथम प्रकाशन नाटक / एकांकिका विजय तेंडुलकर पुरस्कार प्राजक्त देशमुख यांच्या ‘देवबाभळी’ला घोषित झाला आहे, याचे स्वरूप ५० हजार रुपये आहे. प्रौढ वाङ्मय कादंबरी हरी नारायण आपटे पुरस्कार किरण गुरव यांच्या ‘जुगाड’ला जाहीर झाला असून त्याचे स्वरूप १ लाख रुपये आहे. प्रथम प्रकाशन कादंबरी श्री. ना. पेंडसे पुरस्कार संग्राम गायकवाड यांच्या ‘आटपाट देशातल्या गोष्टी’ला जाहीर झाला आहे. याचे स्वरूप ५० हजार रुपये आहे.

प्रौढ वाङ्मय लघुकथा दिवाकर कृष्ण पुरस्कार विलास सिंदगीकर यांच्या ‘बाजार’ला जाहीर झाला आहे. याचे स्वरूप १ लाख रुपये आहे. प्रथम प्रकाशन लघुकथा ग. ल. ठोकळ पुरस्कार दिनकर कुटे यांच्या ‘कायधूळ’ला जाहीर झाला असून याचे स्वरूप ५० हजार रुपये आहे. प्रौढ वाङ्मय ललितगद्य अनंत काणेकर पुरस्कार विनया जंगले यांच्या ‘मुक्या वेदना, बोलक्या संवेदना’ला जाहीर झाला असून त्याचे स्वरूप १ लाख रुपये आहे. प्रथम प्रकाशन ललित गद्य ताराबाई शिंदे पुरस्कार नीलिमा क्षत्रिय यांच्या ‘दिवस आलापल्लीचे’ यास जाहीर झाला असून स्वरूप ५० हजार रु. आहे. प्रौढ वाङ्मय विनोद श्रीपाद कृष्ण पुरस्कार ज्युनिअर ब्रह्मे यांच्या ‘ब्रह्मेघोटाळा’ यास जाहीर झाला आहे, याचे स्वरूप १ लाख रु.आहे.

प्रौढ वाङ्मय चरित्र न. चि. केळकर पुरस्कार सुनीता तांबे यांच्या ‘सागर रेड्डी : नाम तो सुना होगा’ यास जाहीर. प्रौढ वाङ्मय आत्मचरित्र लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार गो. तु. पाटील यांच्या ‘ओल अंतरीची’ यास जाहीर. प्रौढ वाङ्मय समीक्षा / वाङ्मयीन संशोधन श्री. के. क्षीरसागर पुरस्कार डॉ. पराग घोंगे यांच्या ‘अभिनय चिंतन भरतमुनी ते बर्टोल्ट ब्रेख्त’ यास जाहीर. या तिन्ही पुरस्कारांचे स्वरूप एक लाख रुपये आहे. प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र रा. भा. पाटणकर पुरस्कार दा. गो. काळे यांच्या ‘आकळ’ला जाहीर झाला असून त्याचे स्वरूप ५० हजार रुपये असे आहे.प्रौढ वाङ्मय राज्यशास्त्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मंगला गोडबोले यांच्या ‘सती ते सरोगसी’ला जाहीर झाला आहे. प्रौढ वाङ्मय इतिहास शाहू महाराज पुरस्कार नरेंद्र चपळगावकर यांच्या ‘त्यांना समजून घेताना’ यास जाहीर झाला आहे.

प्रौढ वाङ्मय नरहर कुरुंदकर पुरस्कार डॉ. श्यामकांत मोरे यांच्या ‘मालवणी बोली शब्दकोश’ला जाहीर. प्रौढ वाङ्मय विज्ञान, तंत्रज्ञान महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार डॉ. पुष्पा खरे व डॉ. अजित केंभावी यांच्या ‘गुरुत्वीय तरंग’ला जाहीर झाला आहे. तर प्रौढ वाङ्मय शेती वसंतराव नाईक पुरस्कार प्रा. डॉ. द. ता. भोसले यांच्या ‘संवाद बळीराजाशी’ यास जाहीर. प्रौढ वाङ्मय उपेक्षितांचे साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रा. रूपाली अवचरे यांच्या ‘वामन निंबाळकरांची कविता : स्वरूप आणि आकलन’ यास जाहीर. प्रौढ वाङ्मय अर्थशास्त्रविषयक लेखन सी. डी. देशमुख पुरस्कार जयराज साळगावकर यांच्या ‘बिटकॉइन क्रिप्टोकरन्सी’ला जाहीर. प्रौढ वाङ्मय तत्त्वज्ञान व मानसशास्त्र ना. गो. नांदापूरकर पुरस्कार डॉ. सतीश पावडे यांच्या ‘द थिएटर आॅफ द अ‍ॅब्सर्ड’ला जाहीर. प्रौढ वाङ्मय शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या ‘शैक्षणिक षटकार’ यास घोषित झाला.

प्रौढ वाङ्मय पर्यावरण डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार डॉ. संदीप श्रोत्री यांच्या ‘कासवांचे बेट’ यास जाहीर. प्रौढ वाङ्मय संपादित / आधारित रा. ना. चव्हाण पुरस्कार प्रभा गणोरकर यांच्या ‘आशा बगे यांच्या निवडक कथा’ला जाहीर. प्रौढ वाङ्मय अनुवादित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार अनुवादक मेघा पानसरे यांच्या ‘सोविएत रशियन कथा’ यास जाहीर. प्रौढ वाङ्मय संकीर्ण वाङ्मय भाई माधवराव बागल पुरस्कार संजय झेंडे यांच्या ‘पाणीदार माणसं’ला जाहीर झाला आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप एक लाख रुपये असे आहे.

बालवाङ्मय कविता बालकवी पुरस्कार गणेश घुले यांच्या ‘सुंदर माझी शाळा’ यास जाहीर झाला आहे. बालवाङ्मय नाटक / एकांकिका भा. रा. भागवत पुरस्कार डॉ. व्यंकटेश जंबगी यांच्या ‘बालमंच : बाल एकांकिका संग्रह’ यास जाहीर झाला आहे. बालवाङ्मय कादंबरी साने गुरुजी पुरस्कार डॉ. सुमन नवलकर यांच्या ‘काटेरी मुकुट’ला जाहीर झाला आहे. बालवाङ्मय कथा राजा मंगळवेढेकर पुरस्कार मृणालिनी वनारसे यांच्या ‘प्रश्नांचा दिवस’ यास घोषित झाला आहे. बालवाङ्मय सर्वसामान्य ज्ञान यदुनाथ थत्ते पुरस्कार आनंद घैसास यांच्या ‘ताऱ्यांचा जन्म-मृत्यू’ यास जाहीर झाला आहे. बालवाङ्मय संकीर्ण ना. धो. ताह्मणकर पुरस्कार आशा केतकर यांच्या ‘थोर संशोधक’ यास जाहीर झाला आहे. सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार द. तु. पाटील यांच्या ‘चैत’ यास जाहीर झाला आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप ५० हजार रुपये आहे.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र