याकूबला फासावर लटकवा...

By Admin | Updated: July 29, 2015 03:28 IST2015-07-29T03:28:42+5:302015-07-29T03:28:42+5:30

वयाच्या तेराव्या वर्षी १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेत आईला गमावणाऱ्या तुषार देशमुख या तरुणाला ‘याकूब मेमनला फासावर लटकवा’ या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागले

Yakub hanging on the trap ... | याकूबला फासावर लटकवा...

याकूबला फासावर लटकवा...

मुंबई : वयाच्या तेराव्या वर्षी १९९३च्या बॉम्बस्फोट मालिकेत आईला गमावणाऱ्या तुषार देशमुख या तरुणाला ‘याकूब मेमनला फासावर लटकवा’ या मागणीसाठी रस्त्यावर उतरावे लागले. मंगळवारी तुषारने शिवाजी पार्क परिसरात याकूबच्या फाशीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली. अवघ्या काही तासांत हजारो नागरिकांनी त्यावर सही करून याकूबला या टप्प्यावर कोणतीही दया न दाखवता फासावर लटकवा ही तुषारची भूमिका मान्य केली.
दादर परिसरात तुषार आई-वडिलांसह राहायचा. १२ मार्च १९९३चा दुर्दैवी दिवस त्याच्या आयुष्यात आला आणि त्याचे सारे जीवनच विस्कळीत झाले. सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत जाताना आईने दिलेला जेवणाचा डबा अखेरचा ठरला. आई महालक्ष्मी येथील कॅन्टीनमध्ये काम करत होती. त्या दिवशी ती कामावर गेली ती परत आलीच नाही. मी शाळेतून घरी आलो आणि आईची वाट पाहत बसलो. पण दुसऱ्या दिवशी आईचा मृतदेहच घरी आला...’, डोळ्यांमधून ओघळणारे अश्रू पुसत पुसत तुषार सांगत होता.
आई गेल्याने जबरदस्त धक्का बसला होता. त्यातून सावरतो न सावरतो तोच बाबांनी दुसरा धक्का दिला. त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांच्या नव्या संसारात मी कुठेच नव्हतो. वडील असूनही मी अनाथ झालो होतो. तेव्हा शेजारी राहणाऱ्या योगेश म्हात्रे या मित्राने मला आसरा दिला. योगेशच्या आईने मला पंखाखाली घेतले, मुलासारखा सांभाळ केला, तुषार पुढे सांगत होता.
बॉम्बस्फोट घडवून माझे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आरोपींना न्यायालयाने शिक्षा दिली. याकूब त्यापैकीच एक. शिक्षा ठोठावून ८ वर्षे लोटली तरी शिक्षेची अंमलबजावणी होत नव्हती. माझ्याप्रमाणेच अनेक कुटुंबे त्या अंमलबजावणीची वाट पाहत होते. अखेर तो दिवसही ठरला. पण या टप्प्यावर याकूबला फासावर लटकवू नका, त्याला दया दाखवा असा गळा काहींनी काढला. समोर आलेल्या पुराव्यांनुसार याकूबला टाडा न्यायालयाने फाशी ठोठावली. पुढे सर्वोच्च न्यायालयानेही ती कायम केली. असे असताना फाशीचा विरोध करणे म्हणजे देशाच्या न्यायव्यवस्थेचा अपमान करण्यासारखे आहे. शिवाय याकूबला दया दाखवल्यास त्या बॉम्बस्फोटांमध्ये ठार-जखमी झालेल्यांच्या नातेवाइकांच्या भावनांचाही घोर अपमान आहे, असेही तुषार सांगतो.
बॉम्बस्फोट घडविण्यासाठी साहित्य असो अथवा आरोपींना पैसा पुरविण्याचे काम याकूबने केले. जर त्याने हे काम केलेच नसते तर बॉम्बस्फोट मालिका घडली नसती. त्यामुळे याकूबला फाशी झालीच पाहिजे, असे त्याचे म्हणणे आहे. यासाठी शिवाजी पार्क परिसरात सायंकाळी पाच वाजल्यापासून त्याने स्वाक्षरी मोहीम राबविली.

Web Title: Yakub hanging on the trap ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.