टीवायबीए, बीएमएमच्या विद्यार्थ्यांना चुकीच्या गुणपत्रिका
By Admin | Updated: June 24, 2015 05:01 IST2015-06-24T05:01:27+5:302015-06-24T05:01:27+5:30
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे. माटुंग्यातील रुईया महाविद्यालयात टीवायबीए (मॅथमॅटिक्स) पाचव्या

टीवायबीए, बीएमएमच्या विद्यार्थ्यांना चुकीच्या गुणपत्रिका
महेश चेमटे, मुंबई
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सोसावा लागत आहे. माटुंग्यातील रुईया महाविद्यालयात टीवायबीए (मॅथमॅटिक्स) पाचव्या सत्रामधील सात आणि बीएमएमच्या दोन विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाकडून चुकीचे निकालपत्र देण्यात आले. विद्यापीठाच्या चुकीमुळे या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत अडथळे निर्माण झाले आहेत.
मुंबई विद्यापीठाकडून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये टीवायबीएची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा आॅनलाइन निकाल ९ मार्च रोजी लागला. मंगळवारी गुणपत्रिकेचे वाटप झाले. गुणपत्रिका पाहिल्यावर विद्यार्थ्यांना धक्का बसला. या विद्यार्थ्यांना दोन पर्यायी विषय होते. त्यापैकी एक निवडणे बंधनकारक होते. त्यानुसार या विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयासोबत नाकारलेल्या विषयाचा उल्लेखही या गुणपत्रिकांमध्ये आहे. नाकारलेल्या विषयाच्या लेखी परीक्षेत गुण देऊन, प्रॅक्टिकल परीक्षेत अनुपस्थिती दाखवून गुणपत्रिकेवर अनुत्तीर्णचा शेरा देण्यात आला आहे. हा निकाल तांत्रिक अडचणीमुळे आॅनलाइन पाहता आला नव्हता.
बीएमएम अभ्यासक्रम मराठीतून शिकणाऱ्या सुशांत रिसबूड या विद्यार्थ्यालाही ‘लिगल एन्व्हायरोन्मेंट अॅन्ड अॅडव्हर्टायझिंग’ या विषयात गैरहजर दाखवून विद्यापीठाने नापास केले. प्रत्यक्षात त्याने ही परीक्षा दिली होती. त्याला वांद्र्याचे नॅशनल महाविद्यालय हे परीक्षा केंद्र होते.
टीवायबीए गुणपत्रिकेच्या विषय तालिकेमध्ये न्यूमेरीकल मेथड-१ आणि ग्राफ थीअरी कॉम्बेनेटरी या विषयाचा समावेश करण्यात आला. त्यापैकी न्यूमेरिकल हा विषय मी घेतला नव्हता किंवा पर्यायाची निवड करताना नाकारला होता. मात्र या विषयात थीअरीत ७५ पैकी ३० आणि इंटर्नल परीक्षेत अनुपस्थितीत दाखवून मला नापास करण्यात आले, अशी माहिती अक्षय पवार या विद्यार्थ्याने लोकमतला दिली.
आदिती शेणवी या विद्यार्थिनीला यूकेतील वॉरीक विद्यापीठात एमएससी करायचे आहे. मात्र मुंबई विद्यापीठाने अशाच प्रकारे नापास केल्याने यूकेत प्रवेश मिळेल की नाही, अशी भीती तिला वाटत आहे. विद्यापीठाच्या या घोडचुकीची शिक्षा आम्ही आमचे वर्ष वाया घालवून भोगायची का, अशी नाराजी आदितीने व्यक्त केली.
या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी महाविद्यालयाकडून योग्य तो पत्रव्यवहार विद्यापीठाशी केल्याचे रुईया महाविद्यालयाच्या प्राध्यापिका संजीवनी घार्गे यांनी लोकमतला सांगितले.
मात्र याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आमच्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी भूमिका घेतली.