उपमुख्याध्यापकानेच फोडला पेपर! चार प्रश्नपत्रिका फोडल्याची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 12:29 IST2018-03-20T23:36:31+5:302018-03-21T12:29:50+5:30
एसएससी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात शाळेच्या उपमुख्याध्यापकाचाच हात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्याने स्वत: या गोष्टीची कबुली दिली असून त्याच्यासह एकूण ११ जणांच्या मुसक्या माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाने आवळल्या आहेत. यात एका आयटीच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे.

उपमुख्याध्यापकानेच फोडला पेपर! चार प्रश्नपत्रिका फोडल्याची कबुली
मुंबई : एसएससी बोर्डाच्या प्रश्नपत्रिका फोडण्यात शाळेच्या उपमुख्याध्यापकाचाच हात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्याने स्वत: या गोष्टीची कबुली दिली असून त्याच्यासह एकूण ११ जणांच्या मुसक्या माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आणि त्यांच्या पथकाने आवळल्या आहेत. यात एका आयटीच्या विद्यार्थ्याचा समावेश आहे.
फिरोज अब्दुल माजिद खान (४७) असे या शिक्षकाचे नाव आहे. तो किड्स पॅराडाईज शाळेत उपमुख्याध्यापक आहे. तसेच गणित या विषयाचा शिक्षक आहे. अंबरनाथमध्ये तो ‘ब्रिलियंट क्लासेस’ नावाने खासगी शिकवणी चालवतो. तर अन्वरुन हसन (२१) आणि इम्रान शेख (४५) अशी अन्य दोन अटक आरोपींची नावे आहेत. हसन हा आयटीचे शिक्षण घेत आहे तर शेख हा आॅफिसबॉय म्हणून कार्यरत आहे. अंबोली पोलिसांच्या हद्दीत वीरा देसाई रोडवर एव्हीएम स्वामी मुक्तानंद हायस्कूल ही शाळा आहे. जी दहावीच्या परीक्षेच्या केंद्रांपैकी एक आहे. सोमवारी सोशल सायन्स (७३) हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स (पेपर १) इंग्रजी या विषयाची परीक्षा होती. या ठिकाणी हॉलमध्ये पर्यवेक्षक म्हणून संध्या पवार यांना नियुक्त करण्यात आले होते. परीक्षेदरम्यान तीन मुले पुस्तकात आणि मोबाइलमध्ये काही पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा पवार यांनी जवळ जाऊन त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. तेव्हा त्यापैकी एका विद्यार्थ्याकडे पवार यांना मोबाइल सापडला ज्यात सोशल सायन्स (७३) हिस्ट्री पॉलिटिकल सायन्स (पेपर १)ची हुबेहूब प्रश्नपत्रिका बोर्डाच्या कोड क्रमांकासह त्यांनी पहिली. ‘बोर्ड के आयएमपी’ या इंस्टाग्राम अकाउंटवर चार मित्रांना ही प्रश्नपत्रिका त्याने पाठविल्याचे पवार यांना सांगितले. तेव्हा त्यांनी याबाबत वरिष्ठांना कळविले. या मुलांचे मोबाइल हस्तगत करून ते शिक्षकांनी लॉकरमध्ये ठेवले आणि त्यांना परीक्षेला बसविण्यात आले. मात्र त्याचवेळी एसएससी बोर्डाला याबाबत माहिती दिली गेली. ज्यानंतर अंबोली पोलिसांनाही ही बाब कळवत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
चार प्रश्नपत्रिका फोडल्याची कबुली
फिरोज याने अद्याप विज्ञान, इतिहास, गणित आणि भूमिती या चार विषयांच्या प्रश्नपत्रिका फोडल्याचे कबूल केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. बोर्डाचा पेपर शाळेत आला की त्याचे ‘सील’ उघडण्याचा अधिकार फिरोजकडे होता. ज्याचा फायदा उचलत तो प्रश्नपत्रिकेचा फोटो अन्वरुनकडे पाठवायचा. त्यानंतर अन्वरुन ही प्रश्नपत्रिका मुंबईत विद्यार्थ्यांना वाटायचा.