Join us  

व्वा रे बहाद्दर... आम्ही जिजाऊ अन् सावित्रीच्या लेकी, शिवसेना खासदाराला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 6:51 AM

नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

ठळक मुद्देमुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या मागणीवरुन मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा मुद्दा संसदेत गाजला.

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या, पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांची बदली, त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप अशा घटनांच्या मालिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. आता यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत आपल्याला धमकी दिल्याचा आरोप अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. (mp navneet rana writes to lok sabha speaker alleging shiv sena mp arvind sena threatened her) खासदार कौर यांच्या समर्थनार्थ भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भूमिका घेत, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत, असे म्हटलंय. 

नवनीत राणा यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संसदेत भाषण करताना ठाकरे सरकारवर सवाल उपस्थित केले. त्यानंतर अरविंद सावंत यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली, असा आरोप राणा यांनी केला आहे. तू महाराष्ट्रात कशी फिरते, ते मी पाहतो, अशा शब्दांत सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली आहे. नवनीत राणा ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी म्हटलंय. 

व्वा रे बहाद्दर.... महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय? विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या, धमक्या कसल्या देताय, असा प्रश्न अरविंद सावंत यांना चित्रा वाघ यांनी विचारलाय. तसेच, आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाहीत, असे म्हणत आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत नवनीत कौर ताई, असेही त्यांनी म्हटलंय.

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलेल्या परमबीर सिंग यांनी 100 कोटींच्या मागणीवरुन मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा मुद्दा संसदेत गाजला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेंना १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा सिंग यांनी पत्रात केला होता. त्यावरून भाजप खासदारांनी ठाकरे सरकारवर शरसंधान साधलं. अपक्ष खासदार नवनीत राणांनीदेखील सरकारला लक्ष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरूनच खंडणी वसुली होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

आरोप फेटाळले

ठाकरे सरकारवरील टीकेनंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याचा दावा नवनीत कौर यांनी केलाय. मात्र, सावंत यांनी हे आरोप फेटाळले आहेत. मी राणा यांना धमकी का देईन? मी त्यांना धमकी दिली की नाही, हे तिथे उपस्थित असलेले लोकदेखील सांगू शकतील. राणा यांची देहबोली आणि त्यांचे शब्द चुकीचे होते, असं सावंत म्हणाले. त्यावर मी कसं आणि काय बोलायचं हे ते मला सांगणार का, असा सवाल राणा यांनी विचारला. 

टॅग्स :अरविंद सावंतशिवसेनानवनीत कौर राणापरम बीर सिंग