Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरळी किल्ला अंधारात! अर्ध्याहून अधिक दिवे चोरीला, प्रशासनाचं दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:21 IST

वरळी किल्ल्यावर महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करुन झालेल्या सुशोभीकरणाला अक्षरश: हरताळ फासला गेला आहे.

मुंबई

वरळी किल्ल्यावर महापालिकेने दोन कोटी रुपये खर्च करुन झालेल्या सुशोभीकरणाला अक्षरश: हरताळ फासला गेला आहे. किल्ल्यावर रोषणाईसाठी लावण्यात आलेले ११८ दिवे चोरीला गेले असून उर्वरित दिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. याबाबत लवकरच कार्यवाही करुन नवीन दिवे लावले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. 

समुद्री जहाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १६७५ मध्ये किल्ल्याला सध्या अनधिकृत बांधकामांनी वेढा घातला आहे. ही बांधकामे हटवून किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व अबाधित राखण्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यात दोन कोटी रुपये खर्च करुन किल्ल्यावर विजेची रोषणाई करण्यात आली. बेसॉल्ट दगडांचा वॉकवे बांधण्याचे कामही हाती घेण्यात आले. मात्र, अद्याप ते पूर्ण झालेले नाही. 

११८ दिवे चोरीलाकिल्ल्यावर रोषणाईसाठी लावण्यात आलेले ११८ दिवे चोरीला गेले आहेत. याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. 

किल्ल्यावरील अर्ध्याहून अधिक विजेचे दिवे चोरीला१. पालिकेच्या वतीने सुशोभीकरणासाठी आणि किल्ल्यावर रोषणाईसाठी १६५ दिवे लावण्यात आले होते. यापैकी अर्ध्याहून अधिक म्हणजेच शंभरहून अधिक दिवे चोरीला गेले आहेत. 

२. विजेच्या केबलही चोरांनी गायब केल्या आहेत. आता तेथे केवळ ४७ दिवे शिल्लक असून तेसुद्धा नादुरुस्त अवस्थेत आहेत. या दिव्यांची दुरुस्ती फक्त बंगळुरुला केली जाते. त्यामुळे नादुरुस्त दिवे बंगळुरुला पाठवण्यात आले असून लवकरच ते ताब्यात येतील आणि किल्ल्यावर पुन्हा एकदा रोषणाई होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. 

३. यापुढे किल्ल्यावर सलग रोषणाई न करता उपलब्ध दिव्यांनुसार टप्प्याटप्प्यावर रोषणाई करण्याचा पालिकेचा विचार आहे. तसेच परिसरात मोठे फ्लड लाइट लावता येतात का यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पालिकेकडून तातडीने कार्यवाही सुरूया संदर्भात 'लोकमत'ने १६ फेब्रुवारीला वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेने तातडीने कार्यवाही सुरू केली. हा किल्ला लवकरच दिव्यांनी उजळून निघेल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून होत असला तरी हा मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार अजून किती दिवस अंधारात राहणार, याचे ठोस उत्तर मात्र मिळालेले नाही. 

तसेच यापूर्वी अस्वच्छता आणि दुर्गंधीला कारण ठरणारे शौचालय मात्र किल्ल्यापासून दूर हटवण्यात पालिकेला यश आले आहे. 

१६५ दिवे रोषणाईसाठी लावण्यात आले होते. ४७ दिवे शिल्लक असून तेसुद्धा नादुरुस्त अवस्थेत आहेत. 

टॅग्स :मुंबई