Join us  

World Cancer Day: 'कर्करोगाशी लढा शक्य आहे'; कॅन्सरला नामोहरम करणाऱ्या शरद पवारांचा रुग्णांना मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 1:17 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढले आहेत. विशेष म्हणजे आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पवार यांनी आजारावर मातही केली.

मुंबई - आज जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॅन्सर पीडितांना धीर दिला आहे. होय, कर्करोगाशी लढा शक्य आहे, असे सांगून अनमोल आयुष्याची काळजी घेऊया, प्रतिकाराआधी वेळीच प्रतिबंध करूयास, असा संदेश कर्करोगावर आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने मात केलेल्या शरद पवार यांनी दिला आहे. आपल्या फेसबुक पोस्टवरुन आज जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने पवार यांनी कर्करोगाशील लढणाऱ्या रुग्णांना धीर देण्याचं काम केलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी लढले आहेत. विशेष म्हणजे आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पवार यांनी आजारावर मातही केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना पवार यांचा कर्करोगाशी लढा बोलून दाखवला होता. तर, खुद्द शरद पवार यांनीही कर्करोगाशी संबंधित किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. 

गुटख्यामुळे मला कर्करोग झाला. या कर्करोगाशी लढताना तब्बल तीनवेळा माझ्यावर सर्जरी करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच मला एका तरुण डॉक्टरांनी आता, आपले सहा महिने उरलेत, असे सांगितले होते. त्यावेळी, मी त्या डॉक्टरला जवळ बोलावून, तुला पोहोचवल्याशिवाय मी जाणार नाही, असे ठणकावून सांगितले होते, असा किस्साही पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता. या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावरच शरद पवार यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात केली आहे. त्यामुळेच आपल्या अनुभवातूनच त्यांनी, कर्करोगाशी लढा शक्य असे म्हणत कर्करोगी रुग्णांना धीर दिला आहे.   

दरम्यान, जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने कर्करोगासारख्या दुर्धर आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य जागृतीची जाणीव आणि नेणीव सर्वदूर पोहोचवणे महत्त्वाचे आहे, असेही पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून म्हटले आहे. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसकर्करोग