मुंबईच्या घोटाळेबाज ठेकेदारांची कामे ठाण्यातही
By Admin | Updated: June 18, 2016 04:49 IST2016-06-18T04:49:56+5:302016-06-18T04:49:56+5:30
मुंबई महापालिकेने रस्ते घोटाळ्यात ब्लॅक लिस्ट केलेल्या ठेकेदारांची कामे ठाणे महापालिका हद्दीतही सुरु असल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उघड

मुंबईच्या घोटाळेबाज ठेकेदारांची कामे ठाण्यातही
ठाणे : मुंबई महापालिकेने रस्ते घोटाळ्यात ब्लॅक लिस्ट केलेल्या ठेकेदारांची कामे ठाणे महापालिका हद्दीतही सुरु असल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उघड केली. त्यामुळे या ठेकेदारांच्या सुरु असलेल्या कामांची सविस्तर चौकशीसाठी स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी एका त्रिसदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे या बैठकीत पटलावर त्या ठेकेदारांचे जे विषय मंजुरीसाठी आले होते. त्या विषयांनादेखील स्थगिती मिळाली.
मुंबइ महापालिका हद्दीत रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उघड झाल्यानंतर या कामांची चौकशी करतांनाच याप्रकरणात खासगी कंपनीच्या दहा लेखानिरीक्षकांना अटक केली आहे. तसेच रस्त्यांची कामे करणारे संबंधित ठेकेदार अडचणीत आले असून त्यांना मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीत या
ठेकेदारांची कामे सुरु आहेत, का? असा सवाल राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश जाणकर यांनी उपस्थित केला. तर राष्ट्रवादीचे नगरसेवक
नजीब मुल्ला यांनी संबंिधत ठेकेदारांबाबत कोणती दक्षता घेतली, कोणत्या ठेकेदारांची कुठे कामे सुरु आहेत, ब्लॅक लिस्टेड केलेल्या ठेकेदारांची कामे सुरु आहेत, का? अशा नाना प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यावर मुंबई महापालिकेतील रस्ता घोटाळा प्रकरणातील काही ठेकेदारांची कामे शहरात सुरू असल्याचे पालिकेने मान्य केले.
परंतु, त्यांच्या कंपन्यांची यादी उपलब्ध नाही. तसेच या ठेकेदारांनी नेमकी कोणती कामे घेतली आणि ती कुठे सुरु आहेत, याची माहिती नसल्याचे स्पष्ट करून माहिती गोळा करून ती देण्यात येईल, असे शहर अभियंता रतन अवसरमोल यांनी सांगितले. त्यामुळे आक्रमक झालेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांकडे माहितीच नाही
- अशा घटनांच्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांकडे माहिती
उपलब्ध असायला हवी होती आणि त्यांची उत्तरे देण्याची पद्धत चुकीची होती, असे सांगून अतिरिक्त आयुक्त अशोक रणखांब यांनी दिलिगरी व्यक्त केली.
यापुढे अशा घटनांच्या बाबतीत सर्वच विभागांनी संवेदनशीलता दाखवून त्या घटनेच्या अनुषंगाने माहिती जाणून घ्यावी आणि त्या आधारे पुढील उपाययोजना करावी, असेही त्यांनी सांगितले. तर या मुद्यावरुन सदस्यांनी एकप्रकारे अधिकाऱ्यांना जागृत करण्याचे काम केले आहे, असे सांगून ‘पुढच्याला ठेच लागली तर मागच्याने शहाणे व्हायचे असते’ असा सल्लाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
कामांची सविस्तर चौकशी
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन स्थायी समितीचे सभापती संजय वाघुले यांनी त्री सदस्यीय समितीची नेमणूक केली. या समितीत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत, काँग्रेसचे मनोज शिंदे
आणि राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला या तिघांची निवड करण्यात आली. तसेच सभापतीदेखील या समितीचा एक भाग असणार आहेत. ती घोटाळेबाज ठेकेदारांच्या कामांची सविस्तर चौकशी करणार असल्याचेही वाघुले यांनी स्पष्ट केले.