परिवहन समितीत कार्यकर्त्यांची वर्णी

By Admin | Updated: May 18, 2015 22:55 IST2015-05-18T22:55:35+5:302015-05-18T22:55:35+5:30

विशेष समित्या आणि स्वीकृत सदस्य पदांच्या निवडीपाठोपाठ आता मागील वर्षभर रखडलेल्या ठाणे परिवहन समिती सदस्यांच्या निवडीचाही मार्ग मोकळा झाला आहे.

Workers' Welfare Committee in Transportation | परिवहन समितीत कार्यकर्त्यांची वर्णी

परिवहन समितीत कार्यकर्त्यांची वर्णी

ठाणे : विशेष समित्या आणि स्वीकृत सदस्य पदांच्या निवडीपाठोपाठ आता मागील वर्षभर रखडलेल्या ठाणे परिवहन समिती सदस्यांच्या निवडीचाही मार्ग मोकळा झाला आहे. या ठिकाणी नगरसेवकांना संधी मिळावी, असा अट्टहास केला जात होता. परंतु, अखेर येथे आता नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावली जाणार आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण धोरण मागील आठवड्यात झालेल्या महासभेत मंजूर झाले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत परिवहन समितीची निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेतील रखडलेल्या स्वीकृत सदस्य, विशेष समित्या आदी सदस्यांच्या निवड प्रक्रिया मागील महिन्यात पार पडल्या आहेत. परंतु, परिवहन समितीवर जाण्यासाठी आस लावून बसलेले आणि सदस्यपदासाठी अर्ज करून बसलेले विविध पक्षांतील पदाधिकारी मात्र परिवहन समितीच्या सदस्यांची निवड कधी होणार, याची वाट पाहत होते. परंतु, त्या ठिकाणी पक्षातील पदाधिकाऱ्यांना न पाठविता नगरसेवकांनाच संधी द्यावी, असा सूर लावला जात होता. त्यामुळे यासंदर्भातील धोरण ठरविण्यासाठी महासभेत हा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला होता. महापालिकेतील विविध समित्यांसह वृक्ष प्राधिकरण, शिक्षण समिती या ठिकाणी नगरसेवकांची वर्णी लागल्याने सर्वपक्षीय सदस्य नाराज झाले होते. त्यामुळे किमान परिवहन तरी आमच्यासाठी सोडा, असा नारा या कार्यकर्त्यांनी दिला होता. विशेष म्हणजे, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बंडखोरीच्या तयारीत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना राजकीय पक्षांनी परिवहन समिती सदस्यपदाचे गाजर दाखवून त्यांचे बंड शमविले होते. तसेच, निवडणुकीत पराभूत उमेदवार, आरक्षणामुळे निवडणूक लढविण्याची संधी न मिळालेले कार्यकर्ते तसेच पक्षाचे निष्ठावान उपेक्षित कार्यकर्ते आदींचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी परिवहन समिती हा एकमेव पर्याय सर्वच पक्षांपुढे होता. परंतु, राजकीय वाद आणि न्यायालयीन फेऱ्यांमुळे मागील तीन वर्षांत परिवहन समितीवर एकही नवीन सदस्याची निवड झालेली नाही. परिवहन समितीवर एकूण १२ सदस्य निवडले जातात आणि स्थायी समिती सभापती पदसिद्ध सदस्य असतो. तीन वर्षांपूर्वी पदाची मुदत संपल्यामुळे १२ पैकी सहा सदस्य निवृत्त झाले आहेत. यामुळे सहा सदस्यांवरच या समितीचा कारभार सुरू होता. याच सदस्यांमधून दोन वर्षांपूर्वी सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली होती. त्यात भाजपाच्या मदतीने राष्ट्रवादीने बाजी मारली होती. मात्र, वर्षभरापूर्वी या सदस्यांच्या पदाची मुदत संपली. तेव्हापासून परिवहन समितीचा कारभार धोरणात्मक निर्णयासाठी नेमण्यात आलेल्या विशेष समितीच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु, आता या समितीवर नगरसेवकांना संधी डावलण्यात आली असून नाराजांची वर्णी येथे लावली जाणार आहे. त्यानुसार, येत्या काही दिवसांत परिवहन समितीची निवडणूक लागण्याची चिन्हे असून शिवसेनेतून डझनभर इच्छुकांची नावे पुढे आली आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील इच्छुकांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

अर्ज केलेल्या त्या सदस्यांचे काय होणार...
परिवहन समितीमधून सहा सदस्य निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी १४ मार्च २०१२ रोजी सात सदस्यांनी अर्ज भरले होते. यामध्ये कॉंग्रेसचा एक, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे तीन आणि रिपाइंच्या एकाचा समावेश आहे. आजही हे सर्व पदाधिकारी आपली वर्णी लागेल, या आशेवर आहेत. परंतु, या कार्यकर्त्यांचे काय होणार, त्यांना संधी मिळणार का, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Workers' Welfare Committee in Transportation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.