कार्यकर्त्यांचाही इलेक्शन वॉर्डरोब
By Admin | Updated: October 8, 2014 02:15 IST2014-10-08T02:15:05+5:302014-10-08T02:15:05+5:30
निवडणुकांचे रणशिंग फुंकल्यानंतर प्रचाराची धुमाळी सुरू झाली आहे. रिंगणातील उमेदवारांसह कार्यकर्त्यांनीही आपले खास ‘इलेक्शन वॉर्डरोब’ कलेक्शन बनविले आहे.

कार्यकर्त्यांचाही इलेक्शन वॉर्डरोब
स्नेहा मोरे, मुंबई
निवडणुकांचे रणशिंग फुंकल्यानंतर प्रचाराची धुमाळी सुरू झाली आहे. रिंगणातील उमेदवारांसह कार्यकर्त्यांनीही आपले खास ‘इलेक्शन वॉर्डरोब’ कलेक्शन बनविले आहे. डार्क रंग, स्लिमफिट, अॅपलकट, शॉर्टकट अशा स्टायलिश आऊटफिट्सना फाटा देत लाइट कलरचे कुर्ते, जॅकेट्स आणि गुरू शर्टची खास खरेदी सुरू झाली आहे. शिवाय उमेदवारांच्या सौभाग्यवतीही प्रचाराच्या मुख्य सूत्रधार असल्यामुळे साड्यांच्या बाजारपेठेलाही रंग चढला आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान तरुणाईवर मोदींच्या स्टाईलचा पगडा जाणवला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही मार्केटमध्ये फॅशनचे वेगवेगळे ट्रेंड्स दिसून येत आहेत. कॅज्युअल लूकसह कुर्ता, फॉर्मल शर्ट याप्रमाणेच काही जॅकेट टी-शर्टसोबतदेखील वापरले जात आहे. शिवाय विविध राजकीय पक्षांचे प्रचारक, उमेदवार आणि नेतेमंडळी डिझायनर वेअर्सलाही पसंती दर्शवीत आहेत.
आॅक्टोबर हीटचे चटके सहन करीतही निवडणुकीचे वातावरण, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतोच आहे. यात मार्केटमध्ये खादी, लिनन पद्धतीच्या जॅकेटला विशेष मागणी आहे. याकरिता दादर, लालबाग, फॅशन स्ट्रीट्स, लिंक रोड या लोकल मार्केट्समध्येही गर्दी उसळते आहे.
ज्युटच्या जॅकेटला फॅशनेबल लूक असल्याने ते आकर्षक दिसते. या जॅकेटची किंमत जवळपास ५०० ते १००० रुपये आहे. यात ग्रे, ब्लू, लाल, मरून, ब्राऊन, कार्बन ब्लॅक, व्हाइट अशा अनेक रंगसंगती आहेत. शिवाय नुकतेच पंतप्रधान मोदींनी रेडिओवरून खादी वापरण्याचे आवाहन केल्याने खादीची क्रेझ वाढण्यास मदत होत आहे. काळा, पांढरा आणि आॅफ व्हाइट खादीच्या जॅकेटला तरुणांची पसंती मिळते. ७०० ते ९०० रुपयांपर्यंत ही जॅकेट्स आहेत. याशिवाय डेनिम, कॉटन बेस, मिलेट्री पॅटर्न अशा प्रकारांसोबतच काही फॅशनेबल जॅकेट बाजारात दिसतात. फुल स्लीव्हज आणि स्लीव्हलेस असे दोन प्रकार जॅकेटमध्ये आहेत. यातील स्लिव्हलेस जॅकेटला तरुणाईकडून अधिक मागणी आहे.
कोणत्याही कार्यक्रमात जॅकेटशिवाय तरुणांचा पोशाख पूर्णच होत नाही. स्टँड कॉलरचा कुर्ता आणि त्यावर ज्युटचे जॅकेट अशी स्टाईल सध्या प्रचलित आहे. सध्या कुर्ती आणि टॉपमध्ये स्टँड कॉलरचे टॉप पसंतीस पडताना दिसत आहेत. सध्या या टॉपची बाजारात खूपच चलती आहे. यामध्ये कलरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. स्टँड कॉलरमध्ये हाय नेक कॉलर, हाफ स्टँड कॉलर आणि फुल स्टँड कॉलर असे प्रकार आहेत. हायनेक कुर्ते फ्रेश किंवा भडक रंगांमध्ये जास्त खुलून दिसतात. यात बारीक नक्षीचे कुडतेही उपलब्ध आहेत. हाफ स्टँड कॉलर प्रकारात अरुंद गळा आणि मोठ्या पट्ट्या येतात. हाफस्टँड कॉलरमध्ये पार्टीवेअर, नक्षीचे, पूर्ण प्लेन कुर्ते मिळतात.
फुलस्टँड कॉलर प्रकारात पूर्णपणे कॉलरची एक गोल पट्टी असून गळा अतिशय अरुंद आणि छोटा असतो. गळाबंद आणि पूर्ण बाह्यांचे कुडते यातच मोडतात. (प्रतिनिधी)