भार्इंदर महापालिकेला कामगारांचा अल्टिमेटम
By Admin | Updated: June 3, 2015 23:05 IST2015-06-03T23:05:47+5:302015-06-03T23:05:47+5:30
पालिकेच्या कामगार संघटनेने विविध प्रलंबित मागण्या मान्यतेसाठी प्रशासनाला ९ जुलैचा अल्टिमेटम देऊन बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भार्इंदर महापालिकेला कामगारांचा अल्टिमेटम
भार्इंदर : पालिकेच्या कामगार संघटनेने विविध प्रलंबित मागण्या मान्यतेसाठी प्रशासनाला ९ जुलैचा अल्टिमेटम देऊन बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
राज्य शासनाच्या कालबाह्य पदोन्नती धोरणास पालिकेतील ४४१ कर्मचारी पात्र ठरले असून त्यातील केवळ २१२ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. उर्वरित २२९ कर्मचाऱ्यांना त्यापासून वंचित ठेवले असून त्यात सफाई कामगारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आॅक्टोबर २०१४ पासून त्यांच्या वैद्यकीय विम्याचा प्रश्न रेंगाळलेला आहे. प्रशासनाने अलीकडेच नवीन वैद्यकीय विमा कंपनीला नियुक्त केले असतानाही कर्मचाऱ्यांचे सुमारे ७० वैद्यकीय विम्यांचे दावे प्रलंबित आहेत. ते प्रशासनाने फेरतपासणीसाठी जिल्हा सिव्हील रुग्णालयात पाठविल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना सततच्या खर्चिक हेलपाट्यांमुळे ते त्रासदायक ठरत आहे. पालिकेतील पदोन्नती श्रेणीतील कर्मचाऱ्यांखेरीज राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्रभाग अधिकाऱ्यांना वर्ग-२ चे पद देऊन त्यांना मुख्यालयात स्थानापन्न करून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी आवश्यक परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना देण्यात आलेली सुधारित वेतनश्रेणी बंद केली आहे. तत्कालीन महासभेने सुधारित वेतनश्रेणीला मान्यता दिल्यानंतरही लाभार्थी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. यासह अनेक मागण्या प्रशासनाकडे प्रलंबित असून त्यासाठी कामगार संघटना सतत पाठपुरावा करीत आहे. (प्रतिनिधी)