फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना कारने चिरडले
By Admin | Updated: May 11, 2015 02:19 IST2015-05-11T02:19:03+5:302015-05-11T02:19:03+5:30
सलमान खानच्या हिट अॅण्ड रन प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर अशाच प्रकारे एका भरधाव कारने दोन जणांना चिरडले.

फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना कारने चिरडले
मुंबई: सलमान खानच्या हिट अॅण्ड रन प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर अशाच प्रकारे एका भरधाव कारने दोन जणांना चिरडले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला; तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
चेंबूरवरून सांताक्रुझ किंवा वांद्रे येथे जाण्यासाठी पूर्वी सायनला विळखा घालून जावे लागत असे. मात्र वर्षभरापूर्वीच सुरू झालेल्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडमुळे हे अंतर कमी झाले आहे. त्यातच या मार्गावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने अनेक वाहने भरधाव वेगात येथून जात असतात.
शुक्रवारी पहाटे भरधाव वेगात जात असलेल्या एका क्वॉलिस चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ही कार फुटपाथवर चढली. या वेळी या फुटपाथवर झोपलेल्या सुनील उपाध्ये (३0) आणि रोशन उपाध्ये (२२) या दोन मजुरांना कारने चिरडले. दोघांनाही तत्काळ उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच यातील सुनीलचा मृत्यू झाला; तर रोशनवर उपचार सुरू आहेत.
याबाबत व्ही. बी. नगर पोलिसांनी कारचालक कमलेश कांबळेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (प्रतिनिधी)