Join us
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या गोंधळात कार्यकर्ते संभ्रमात, प्रचार कुणाचा आणि कसा करायचा ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:40 IST

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर भाजपने दुसऱ्या दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली, तर शिंदेसेनेने आपले उमेदवार कोण, हे गुरुवार संध्याकाळपर्यंत गुलदस्त्यातच ठेवले होते.

मुंबई :  महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरून झाले. मात्र, प्रभागातील मतदार आणि काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मनात आपला नेमका उमेदवार कोण, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रचार कुणाचा आणि कसा करावा, असा प्रश्नही त्यांना पडल्याचे चित्र आहे.    

उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर भाजपने दुसऱ्या दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली, तर शिंदेसेनेने आपले उमेदवार कोण, हे गुरुवार संध्याकाळपर्यंत गुलदस्त्यातच ठेवले होते. आता महायुतीतील दोन्ही पक्ष १२ जागा (६-६) रामदास आठवले यांच्या रिपाइंला सोडणार असल्याचे निश्चित झाल्याने आणखी काही अधिकृत उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत. यामुळे गोंधळात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.  

काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी युती केली आणि वंचितसाठी ६२ जागा सोडल्याची घोषणा केली. मात्र, वंचितने ४६ उमेदवार रिंगणात उतरवले. काँग्रेसने काही जागा महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडल्याचे बोलले जाते. त्यामुळे काँग्रेस कोणत्या व किती जागांवर लढत आहे, हेही अस्पष्ट आहे.  

सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहणमुंबईत सर्वच पक्षांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. २०१७ नंतर महापालिका निवडणूक होत असल्याने पुढील चार वर्षे कोणतीच निवडणूक नसल्याने अनेक इच्छुक वरिष्ठ नेत्यांचे किंवा अन्य कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत, असे दिसते. प्रभाग क्र. २००मध्ये भाजपचा अधिकृत उमेदवार असूनही एकाने बंडखोरी केली आहे. 

प्रभाग क्र. १७३मध्ये अशीच स्थिती आहे. या प्रभागात शिंदेसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. १६९ मध्ये उद्धवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने बंडखोरी केल्यामुळे संभ्रम आहे.

मनसेच्या ५३ उमेदवारांची नावे जाहीर झाली असली तरी उद्धवसेनेत मात्र उमेदवार कोण, याबाबत फारशी स्पष्टता नसल्याचे दिसते.  बंडखोरही मोठ्या संख्येने मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Confusion Among Workers: Whose Campaign to Promote and How?

Web Summary : Mumbai's election sees candidate confusion, leaving workers unsure of who to support. All parties face rebellion, adding to the chaos. Congress's alliances further complicate the picture, blurring candidate clarity. Many candidates are battling it out, leaving workers in disarray.
टॅग्स :मुंबई महापालिका निवडणूक २०२६मुंबईनिवडणूक 2026