लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पश्चिम रेल्वेवरील बोरीवली ते विरारदरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गिका आणि मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारादरम्यान तिसऱ्या मार्गिकेसाठी २९.३२ हेक्टरवरील वनजमिनींवर झाडे तोडण्यासाठीची मंजुरी केंद्र सरकारसह राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने दिली आहे. बोरीवली पट्टयातील कांदळवने, कल्याण परिसरातील संरक्षित वने, खासगी वनजमिनींवरील झाडे तोडल्यानंतर नव्या रेल्वे मार्गिका उभारणीला वेग येणार आहे.
कल्याण ते कसारादरम्यान तिसऱ्या मार्गिकेसाठी ठाणे जिल्ह्यातील १७ गावांमधील १६.५४ हेक्टर जमिनीवरील झाडांची तोडणी केली जाणार आहे. यात संरक्षित वने, पुनर्स्थापिक खासगी वने, अंतिम संपादित वनांचा समावेश आहे. ठाण्यातील मुख्य वनसंरक्षक यांनी यासाठी काम सुरू करण्याची परवानगी दिली. ५ डिसेंबर २०२५ पर्यंत परवानगी वैध आहे. बोरीवली ते विरारदरम्यानच्या मार्गिकेसाठी १२.७८ हेक्टर वनजमिनीवरील कांदळवनावर कुऱ्हाड कोसळणार आहे. उपनगरासह ठाणे, पालघरमधील जमिनीचा समावेश आहे.
कोट्यवधींचा खर्च
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) एमयूटीपी- ३ अ प्रकल्पांतर्गत बोरीवली-विरार पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण करण्यात येत आहे. २६ किमीच्या या नव्या मार्गिकांसाठी २,१८४.०२ कोटी खर्च अपेक्षित आहे.
कल्याण-कसारा तिसरा मार्ग
प्रकल्प मंजूर - सप्टेंबर २०१५अपेक्षित खर्च - ७९२ कोटी रुपयेप्रकल्प राबवणारी यंत्रणा - मध्य रेल्वे
बोरीवली-विरार पाचवा-सहावा मार्ग
प्रकल्प मंजूर - डिसेंबर २०१८अपेक्षित खर्च - २,१८४ कोटी रुपयेप्रकल्प राबवणारी यंत्रणा - मुंबई रेल्वे विकास महामंडळ