मुंबई : वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. सायन - पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा असून, तो लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
सायन - पनवेल मार्गावर मानखुर्द आणि नवी मुंबईला जोडण्यासाठी वाशी खाडीवर सहा पदरी पूल आहे. हा पूल १९९४ मध्ये वाहतुकीला सुरू करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावरील वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली. त्यामुळे हा पूल अपुरा पडत आहे. परिणामी, वाशी टोल नाका भागात वाहनांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते.
वाहनचालकांची कोंडीतून होणार सुटका
मानखुर्दहून वाशीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणारा पूल ऑक्टोबरमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या वाहनांसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचेही काम पूर्ण झाले आहे. सध्या पुलाच्या रंगरंगोटीचे आणि खांबांना रंगरंगोटी करण्याचे काम सुरू आहे.
आता या नवीन पुलावरून वाहतुक सुरू केली जाऊ शकते, अशी माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या पुलामुळे वाशी खाडी पुलावर होणारी वाहतूक कोंडी टळणार असून, वाशी ते मानखुर्द हा प्रवासही जलदगतीने होण्यास मदत मिळणार आहे. त्यातून ऐन कार्यालयीन वेळेत वाहनचालकांना कोंडीत अडकून वेळेचा होणारा अपव्यय टळणार आहे.
दोन पुलांची उभारणी
जुन्या पुलावर होणारी कोंडी सोडवण्यासाठी सध्या वाहतुकीसाठी सुरू असलेल्या ठाणे खाडी पुलाच्या दोन्ही बाजूंना समांतर असे प्रत्येकी तीन मार्गिकांचे आणखी दोन पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) उभारण्यात आले आहेत.
५५९ कोटी रुपये प्रकल्पासाठी खर्च
३८० मीटर मुंबईकडील पोहोच मार्ग
१८३७ मीटर पुलांची लांबी प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन पूल