कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
By Admin | Updated: March 13, 2015 01:26 IST2015-03-13T01:26:26+5:302015-03-13T01:26:26+5:30
भांडुप एस विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचा फटका नागरिकांना बसल्याने

कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
मुंबई : भांडुप एस विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचा फटका नागरिकांना बसल्याने संतप्त जमावाने प्रशासनाविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात नागरिक विरुद्ध पालिका कर्मचारी असे वातावरण निर्माण झाले होते.
एस विभागाचे इमारत आणि कारखाना विभागाचे कनिष्ठ अभियंता अमित पाटील यांना केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी हे आंदोलन छेडण्यात आले होते. बुधवारी दुपारच्या सुमारास पाटील आणि त्यांचे सहकारी अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. अनधिकृत बांधकामाचा फोटो काढत असताना आरोपी आसिफ सिद्दिकी आणि अमीर सिद्दिकीने त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर पाटील यांनी विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिद्दिकी बंधंूना विक्रोळी पोलिसांनी अटक केली.
या घटनेच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांनी एस विभाग कार्यालयाबाहेरच सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत काम बंद आंदोलन पुकारले होते. अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले रोखून आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मात्र, अचानक सारेच काम ठप्प झाल्याने नागरिकांची मोठी पंचाईत झाली. विविध कामांसाठी एस विभागाकडे धाव घेतलेल्या नागरिकांना या आंदोलनाचा नाहक फटका बसला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात नारेबाजी करण्यास सुरुवात केली. या गोंधळामुळे परिसरात नागरिक विरुद्ध पालिका कर्मचारी असे वातावरण निर्माण झाले होते. अखेर दुुपारी तीनच्या सुमारास आंदोलन थंडावल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली. (प्रतिनिधी)