मानकर काकांचे कार्य दुर्लक्षितच...
By Admin | Updated: November 30, 2015 02:30 IST2015-11-30T02:30:55+5:302015-11-30T02:30:55+5:30
‘टॉनिक’च्या मानकर काकांच्या दु:खद निधनाबद्दल साहित्य-कलाविश्वातील दिग्गजांकडून हळहळ व्यक्त होत आहे. ‘जो करील मनोरंजन मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे’ असे म्हणत

मानकर काकांचे कार्य दुर्लक्षितच...
‘टॉनिक’च्या मानकर काकांच्या दु:खद निधनाबद्दल साहित्य-कलाविश्वातील दिग्गजांकडून हळहळ व्यक्त होत आहे. ‘जो करील मनोरंजन मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे’ असे म्हणत साने गुरुजींचा वारसा पुढे नेणाऱ्या मानकर काकांचे सगळ्यांशीच आगळे वेगळे नाते होते. मानकर काकांच्या याच आठवणी काही दिग्गजांनी ‘लोकमत’कडे उलगडल्या आहेत...
मानकर काकांचा आणि माझा परिचय गेल्या ४० वर्षांचा. मी लग्न होऊन मुलुंडला आले आणि तेव्हापासून आमचे त्यांच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. तेही आमच्या घरी येऊन-जाऊन असत. मानकर काकांचे व्यक्तिमत्त्व तसे पहाडासारखे होते; पण मनाने मात्र ते फार हळवे होते. लोण्याहून मऊ असा त्यांचा स्वभाव होता.
त्यांनी आयुष्यभर मुलांसाठी कष्ट केले आणि उत्तम साहित्य निर्माण केले. ते चित्रकारही होते. साहित्य आणि चित्रकला या दोहोंचा उपयोग त्यांनी मुलांसाठी केला. मानकर काकांनी अगदी स्वत:च्या खिशाला खार लावून मुलांसाठी अविरत सेवा बजावली. नवनव्या कल्पना ते राबवायचे. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा सामावली होती. निशिगंधाच्या ‘इवलू टिवलू’ या पुरस्कारप्राप्त पुस्तकाची सजावट मानकर काकांनी केली होती.
पण असे सगळे असले तरी त्यांचे हे कार्य कुठेतरी दुर्लक्षिले गेले आहे असे मला वाटते. त्यांना मानाने जे सन्मान मिळायला हवे होते, ते त्यांना मिळाले नाहीत अशी माझी धारणा आहे. बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यात येते. या संमेलनाचे ते अध्यक्ष व्हायला हवे होते. मात्र ते माझ्या हातात नव्हते. तरीपण ते या संमेलनाचे अध्यक्ष होऊ न शकल्याची खंत माझ्या मनात कायम राहिली आहे.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आणि त्यांचे दृढ नाते होते. आता मानकर काका नसले, तरी विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने मानकर काकांचे कार्य त्यांच्या पश्चात असेच पुढे सुरू ठेवावे असे मला वाटते.
मुलांसाठी एकहाती मासिक चालवण्याचे काम त्यांनी केले. सुरुवातीला तर हे मासिक ते स्वत:च्या हस्ताक्षरात काढत असत. त्यांना कोणतेही पाठबळ नसताना त्यांनी केलेले हे कार्य खूप मोठे आहे. साहित्य आणि चित्रकला यांची त्यांना उत्तम समज होती. मुलांविषयी त्यांना अपार प्रेम होते. एखादे व्रत घेतल्याप्रमाणे त्यांनी हे काम केले; पण त्यांच्या या कार्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही, याचे वाईट वाटते.
- रत्नाकर मतकरी, साहित्यिक, नाटककारअतिशय धडपड करून मानकर काकांनी मुलांसाठी काम केले होते. ते स्वत:हून शाळाशाळांतून फिरताना कायम दिसायचे. अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या व्यक्ती फार थोड्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात कायमच आदरभावना राहिली. मानकर काका मला एकदा म्हणाले होते, की मुलांसाठी असे काम करणारे काही लोक असतील तर मला नक्की सांगा. पण अशा प्रकरचे काम करणारे लोक मला हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही मिळाले नाहीत. त्यामुळे मी त्यांना याबाबतीत मदत करू शकले नाही याचे मला वाईट वाटते. मानकर काका मुलांसाठी जे काम करत होते, त्याची नोंद सरकारने घेतली असती तर ते कार्य अजून मोठे झाले असते. मानकर काका सर्वांच्याच परिचयाचे होते; पण त्यांची योग्य दखल घेतली गेली असती तर त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले असते.
- विद्या पटवर्धन, बालनाट्य दिग्दर्शिका