कर्जत-कल्याण रस्त्याचे काम निकृष्ट
By Admin | Updated: July 13, 2015 22:47 IST2015-07-13T22:47:48+5:302015-07-13T22:47:48+5:30
हाळफाटा पळसदरीमार्गे कर्जतवरून कल्याणला जाणाऱ्या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्राधिकरणाने केले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पहिल्याच

कर्जत-कल्याण रस्त्याचे काम निकृष्ट
खालापूर : हाळफाटा पळसदरीमार्गे कर्जतवरून कल्याणला जाणाऱ्या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्राधिकरणाने केले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याने कामाच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाला आहे.
रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे झालेले नाही, संबंधित ठेकेदाराने कामाचा दर्जाही राखलेला नाही. अनेक ठिकाणी काम अर्धवट अवस्थेत असल्याने कामाची गुणवत्ता तपासल्यानंतरच ठेकेदाराचे अंतिम बिल अदा करावे, अशी मागणी आमदार सुरेश लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
एमएमआरडीएने हाळ फाटा, कर्जत, कल्याण रस्त्याचे काम केले आहे. पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. हा रस्ता चार पदरी असून वनखात्याच्या जमिनीव्यतिरिक्त काही ठिकाणी जागा उपलब्ध असून सुद्धा ठेकेदाराने रस्त्याचे काम केलेले नाही. त्यामुळे काही ठिकाणी चौपदरी तर काही ठिकाणी केवळ एकपदरीच रस्ता तयार करण्यात आला आहे. वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात झाले आहेत. वन खात्याकडून जमिनी संपादित करण्याची कार्यवाही चार वर्षांनंतरही पूर्ण झालेली नाही. या रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्यानंतरही तक्रारी मात्र कमी झालेल्या नाहीत. त्यामुळे आ. सुरेश लाड यांनी या प्रकरणात थेट मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालावे, अशी विनंती केली आहे.
रस्त्यासाठी कामाचा दर्जा राखला गेलेला नसल्याने पहिल्याच पावसात रस्त्याची दैना झाली आहे. त्यामुळे कामाच्या गुणवत्तेची तपासणी करून अर्धवट असलेले काम पूर्ण केल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला अंतिम बिल अदा करू नये.
- सुरेश लाड, आमदार, कर्जत.