भूमी अभिलेख इमारतीचे काम रखडले!

By Admin | Updated: July 5, 2014 03:33 IST2014-07-05T03:33:29+5:302014-07-05T03:33:29+5:30

तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाची नियोजित इमारत ज्या जागेवर बांधण्यात येणार आहे,

Work on the building of the Land Records | भूमी अभिलेख इमारतीचे काम रखडले!

भूमी अभिलेख इमारतीचे काम रखडले!

महाड : तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाची नियोजित इमारत ज्या जागेवर बांधण्यात येणार आहे, त्याच जागेवर सावित्री नदीत बेकायदा वाळू उत्खनन करणारे सक्शन पंप व होड्या टाकून ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इमारतीचे बांधकाम सुरु करण्यास विलंब होत असून यावर प्रांताधिकारी कार्यालयाकडून कुठलीही कार्यवाही होत नसल्याने या इमारतीचे काम रखडले आहे.
महाड प्रांताधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक यांच्या मालकीचा भूमापन क्र. २०५९ स.नं.१२८ अ, क्षेत्रफळ ५०० चौ.मीटर हा भूखंड असून या भूखंडावर संबंधित कार्यालयाची सुसज्ज इमारत बांधण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. कायम वर्दळीचे असलेले हे कार्यालय अनेक वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरु आहे. या कामी दीड वर्षापूर्वी शासनाने ६५ लक्ष रु. चा निधी मंजूर करुन हा निधी इमारत बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्वरित वर्ग केला. सा. बां. विभागानेही याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करुन सहा महिन्यांपूर्वी या कामाची वर्क आॅर्डरही एका ठेकेदाराला दिली. मात्र ज्या जागेवर इमारत बांधायची आहे त्या जागेवर प्रांताधिकाऱ्यांनी जप्त केलेले सक्शन पंप, होड्या आदी लोखंडी सामग्री या जागेवर टाकून ठेवण्यात आल्यामुळे या ठिकाणी इमारतीचे बांधकाम सुरु करणे अशक्यप्राय बनले आहे. ही सर्व सामग्री हलवण्यासाठी सुमारे २ ते ३ लाख रु. खर्च होणार असल्यामुळे हा खर्च करायचा कुणी, असा प्रश्न आहे. सदरची सामग्री हलवण्यासाठी कोकण विभागीय भूमी अभिलेख, आयकर जिल्हा अधीक्षक व तालुका भूमी अभिलेख उपअधीक्षक यांनी जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी महाड यांना वारंवार पत्रव्यवहार तसेच तोंडी देखील विनंती केली. मात्र यावर कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे तालुका भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारतीच्या कामाला मुहूर्त सापडत नाही, असे दिसून येत आहे. या इमारतीचे काम मार्गी लागल्यास या कार्यालयाच्या भाड्यापोटी दरवर्षी होणाऱ्या खर्चात शासनाची बचत होणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Work on the building of the Land Records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.