Join us  

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाचा शब्द शिवसेनेला दिलेला नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 2:59 AM

भाजपासोबतच आणि शिवसेनेच्याही नेत्यांच्या संपर्कात मी आहे. युती टिकावी - गडकरी

मुंबई : 'अजूनही वेळ गेलेला नाही. अजूनही चर्चा होऊ शकते' असं सांगत नितीन गडकरी यांनी अजूनही शिवसेनेशी सत्तास्थापनेबाबत चर्चा अजूनही होऊ शकते, असे संकेत शुक्रवारी दिले. अडीच - अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटण्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी कधीही शब्द दिलेला नव्हता,या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्यास गडकरी यांनी दुजोरा दिला.

भाजपासोबतच आणि शिवसेनेच्याही नेत्यांच्या संपर्कात मी आहे. चर्चा सुरू आहे. भाजपा - शिवसेनेची युती ही हिंदुत्वाच्या मुद्यावर आहे. अनैसर्गिक युती टिकत नाही. युती तोडायची की राखायची किंवा कुणासोबत युती करायची? हा सर्वस्वी शिवसेनेचा अधिकार आहे. अजूनही वेळ गेलेला नाही, अजूनही चर्चा होऊ शकते, असे म्हणत गडकरींनी शिवसेनेला चर्चेसाठी साद घातली.'अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत माझे अमित शहा यांच्याशी बोलणे झाले. अडीच वर्षांबद्दल कुठल्याही प्रकारचे आश्वासन भाजपाध्यक्षांनी शिवसेनेला दिले नव्हते. लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा चर्चा झाली तेव्हा अडीच - अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल शिवसेनेनंच विषय मांडला. तेव्हा सध्या चर्चा थांबवू आणि विधानसभेनंतर पाहू असे म्हणत बैठक संपवण्यात आली होती. नंतर बोलू याचा अर्थ आश्वासन दिले असे होत नाही' असेही गडकरी म्हणाले.

टॅग्स :नितीन गडकरीभाजपाशिवसेना