Join us

कुठे थरार, कुठे देखाव्यांची बहार; अवघी मुंबई पुन्हा थक्क: पुरुष गोविंदांसह महिला पथकांचीही कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 06:14 IST

सोमवारी रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केल्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक गोविंदा पथकांनी सलामी देत हंड्या फोडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठी, हिंदी गाण्यांच्या तालावर फेर धरत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदांचा थरार पाहताना अवघी मुंबई पुन्हा एकदा थक्क झाली. यात पुरुष गोविंदा पथकांच्या जोडीने महिला पथकांनीही दादर, लालबाग, परळसारख्या परिसरात थरांवर थर रचत मुंबईकरांचे लक्ष वेधले. यानिमित्ताने उमरखाडीपासून लालबाग, मुंबादेवी आणि गिरगाव परिसरात काढण्यात आलेल्या पौराणिक देखाव्यांनी रस्ते सजले होते.

वरळी येथे सचिन अहिर, मागाठाणे येथे प्रकाश सुर्वे, घाटकोपरमध्ये राम कदम यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात मनोरंजनाची धम्माल उडत असतानाच दक्षिण मुंबईतील मराठमोळ्या परिसरात चित्ररथ देखाव्यांनी मुंबईकरांचे लक्ष वेधले होते. सोमवारी रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्माचा उत्सव साजरा केल्यानंतर अनेक ठिकाणी स्थानिक गोविंदा पथकांनी सलामी देत हंड्या फोडल्या; त्यानंतर पहाटेपासून गोविंदा मुंबईतल्या विविध हंड्यांकडे आगेकूच करू लागले.

यावेळी बहुसंख्य गोविंदांनी राजकीय पक्ष आणि नेत्यांनी दिलेले टी-शर्ट घातल्याचे दिसून आले. त्यामुळे यंदाच्या उत्सवात आगामी निवडणुकांची चाहूल प्रकर्षाने दिसून आली. बाइकवरचे गोविंदा ट्रकचे सारथ्य करत दहीहंडी बांधलेल्या ठिकाणी दाखल होत होते. त्यानंतर थरांसाठीचा फेर धरला जात होता. प्रशिक्षकाने शिट्टी वाजविल्यानंतर गोविंदांचे मनोरे उंच उंच जात असताना प्रेक्षकांचा श्वासही स्वाभाविकपणे रोखून धरला जात होता. सकाळपासून सुरू झालेला दहीहंडीचा थरार दुपारी काही क्षण विसावला होता. त्यात अधूनमधून बरसणाऱ्या सरी गोविंदांना सुखावत होत्या. दुपारनंतर सायंकाळपर्यंत गोविंदांचा जोश पुन्हा वाढत गेला.

कविता, शिट्ट्या आणि टाळ्याघाटकोपर पश्चिमेला राम कदम यांच्यातर्फे उभारण्यात आलेल्या हंडीला अभिनेते-अभिनेत्रींसह राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विशेषत उपस्थिती दर्शविली होती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यासपीठावर सादर केलेल्या कवितांना प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दाद दिली. याव्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी उपस्थित लावत गोविंदांच्या कौशल्याला दाद दिली.

बँडचे विशेष आकर्षणवरळी नाक्यावर शिवसेनेतर्फे बांधण्यात आलेली हंडी फोडताना वाजवला जाणारा बँड हे गोविंदांसह सर्वांसाठीच विशेष आकर्षण ठरले. यामध्ये गोविंदांनी पाच ते सात थरांची सलामी दिल्यानंतर ते बँडच्या तालावर फेर धरत होते.

डीजेचा दणदणाट कुर्ला पश्चिमेकडील अशोक लेलँडच्या नाक्यावर मनसेतर्फे उभारण्यात आलेल्या दहीहंडीत डीजेचा दणदणाट होता. सकाळपासून गोविंदा पथकांची सुरू झालेली सलामी सायंकाळपर्यंत कायम होती.

बेंजोवर थिरकला गोविंदादादर पश्चिमेकडील रेल्वेस्थानक परिसरात डीजेच्या दणदणाटासह बेंजोच्या तालावर गोविंदा पथके हंड्या फोडत होती. महिला गोविंदा पथकांची सलामी पाहण्यासाठी बघ्यांची येथे मोठी गर्दी झाली होती.

टॅग्स :दहीहंडीमुंबई