मॅट्रिमोनियल साइटवरून महिलांभोवती जाळे
By Admin | Updated: June 12, 2017 00:34 IST2017-06-12T00:34:22+5:302017-06-12T00:34:22+5:30
विवाह करण्याचे आश्वासन देत महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या नितीन पांचाळ याने विवाहविषयक वेबसाइटवरून

मॅट्रिमोनियल साइटवरून महिलांभोवती जाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विवाह करण्याचे आश्वासन देत महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या नितीन पांचाळ याने विवाहविषयक वेबसाइटवरून अनेक महिलांशी संपर्क साधून त्यांचे शोषण केल्याचे तपासातून उघडकीस आले.
विवाह करण्याचे वचन देत शरीरसंबंध ठेवून अश्लील छायाचित्रे काढल्याच्या आरोपावरून मालाड (पूर्व) येथील महेंद्रनगरात राहाणाऱ्या नितीन पांचाळ याच्याविरुद्ध चारकोप पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या नितीन पांचाळ फरार झाला आहे.
यातील पीडित महिलेशी सहा वर्षांपूर्वी नितीन पांचाळ याच्याशी ओळख झाली होती. आपण घटस्फोटीत असल्याचे सांगून नितीन पांचाळ याने तिला विवाह करण्याचे वचन दिले. त्या दरम्यान तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. त्याच वेळी विश्वास संपादन करून एक लाख रुपयांची मागणी केली. विवाह करण्याचे ठरले असल्याने आपण त्याला तीन टक्के व्याजाने त्याला कर्ज काढून दिले. बरेच दिवस ती रक्कम परत न केल्याने विचारणा केली असता त्याने धमकावल्याचे तक्रारदार महिलेने तक्रारीत म्हटले आहे. पैसे मागितल्यावर पांचाळने मोबाइलमधील महिलेच्या नकळत काढलेले तिचे अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. काही फोटो त्याने आपल्या मोबाइलवरही पाठवल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी नितीन पांचाळ याने मॅट्रिमोनियल साइटवरून अनेक घटस्फोटीत महिलांशी संपर्क साधून त्यांना आपल्या जाळ््यात ओढल्याची माहिती तपासातून उघड झाली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.