Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा भारत ‘अ’ संघ खेळविल्यास अधिक फायदा होईल -  पूनम राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 20:23 IST

पुरुष क्रिकेटप्रमाणे महिलांसाठीही भारत ‘अ’ संघांच्या सामन्यांचे व मालिकांचे आयोजन करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतल्यास खूप आनंद होईल. यामुळे मुलींना अधिक अनुभव येईल, शिवाय त्यांना मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक संधीही उपलब्ध होतील,’ अशी प्रतिक्रीया भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज पूनम राऊतने दिली. 

मुंबई, दि. 16 - पुरुष क्रिकेटप्रमाणे महिलांसाठीही भारत ‘अ’ संघांच्या सामन्यांचे व मालिकांचे आयोजन करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतल्यास खूप आनंद होईल. यामुळे मुलींना अधिक अनुभव येईल, शिवाय त्यांना मुख्य संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक संधीही उपलब्ध होतील,’ अशी प्रतिक्रीया भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज पूनम राऊतने दिली. शनिवारी मुंबईतील कांदिवली येथील पोयसर जिमखाना येथे पूनम राऊत क्रिकेट अकादमीचे खासदार पूनम महाजन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी, भारताची स्टार फलंदाज व उपकर्णधार हरमनप्रित कौर आणि यष्टीरक्षक नुझत प्रविण यांचीही विशेष उपस्थिती होती. पुरुष क्रिकेटमध्ये महिलांचेही भारत ‘अ’ संघ तयार करण्याबाबत बीसीसीआयने विचार करीत आहे. याबाबत पूनमला विचारले असता ती म्हणाली की, ‘सुरुवातीला महिलांसाठी जास्त देशांतर्गत क्रिकेट सामने होत नव्हते. पण आता चित्र बदलत आहे. नक्कीच आम्हाला कमी मालिका खेळायला मिळतात, पण आता बीसीसीआयने ‘अ’ संघांचे दौरे सुरु करण्याचा विचार केल्याने महिला क्रिकेटमध्ये अधिक गुणवत्ता येईल. हा निर्णय निश्चित झाल्यानंतर मुलींकडे क्रिकेटसाठी खूप संधी असेल.’ 

या प्रस्तावित निर्णयाविषयी हरमनप्रीत म्हणाली, ‘विश्वचषकनंतर महिला क्रिकेटबाबत बीसीसीआयमध्ये महिला क्रिकेटच्या प्रगतीसाठी अनेक निर्णय होत आहेत. याआधी सामने कमी होत होते. पण आता तसे होणार नाही. प्रत्येक खेळाडूला संधी असेल.’ आपल्या पुढील ध्येयाविषयी पूनमने म्हणाली की, ‘आम्हाला विश्वचषक जिंकण्याचे अधुरे स्वप्न पूर्ण करायचे आहे. जास्तीत जास्त योगदान देण्याचा आम्ही प्रयत्न करु. आमच्यामागेही खूप मोठा बेंच स्ट्रेंथ आहे. त्यांनाही आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करु. कारकिर्दीच्या दृष्टीकोनातून मुलींनी क्रिकेटकडे वळावे यासाठी आमचा प्रयत्न असेल.’

विश्वचषकनंतर सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे दबाव राहील. पण यासाठी आम्ही खूप मेहनतही घेत आहोत. जबाबदारी वाढली असली तरी आम्ही याकडे सकारात्मकतेने बघतोय. आज आमच्यासाठी सुविधांमध्ये वाढ झाली आहे. अपेक्षांचे ओझेही वाढले आहे, पण आम्ही याचा आनंद घेत आहोत. - पूनम राऊत

पूनम राऊत क्रिकेट अकादमीसाठी राज्यभरातून सुमारे २०० हून अधिक मुलींनी निवड प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यातील निवडक ६५ मुलींना प्रथम निवडण्यात आले. यानंतर सर्वोत्तम ४० मुलींची अंतिम शिबिरासाठी निवड झाली. दरम्यान, या अकादमीमध्ये क्रिकेटव्यतिरिक्त प्रत्येक मुलीच्या शैक्षणिक अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून मिळाली

टॅग्स :क्रीडा