पोलिसांच्या बदलीविरोधात महिलांचा मोर्चा

By Admin | Updated: April 15, 2015 00:32 IST2015-04-15T00:32:14+5:302015-04-15T00:32:14+5:30

भाजपा सरकारने पोलीस दलात केलेल्या फेरबदलांपैकी हिमांशू रॉय आणि रवींद्र सिंगल यांच्या बदल्या पोलिसांसह जनतेलाही झोंबल्या आहेत.

Women's Front Against Police Replacement | पोलिसांच्या बदलीविरोधात महिलांचा मोर्चा

पोलिसांच्या बदलीविरोधात महिलांचा मोर्चा

मुंबई : भाजपा सरकारने पोलीस दलात केलेल्या फेरबदलांपैकी हिमांशू रॉय आणि रवींद्र सिंगल यांच्या बदल्या पोलिसांसह जनतेलाही झोंबल्या आहेत. सिंगल यांच्या बदलीविरोधात आज घाटकोपरमध्ये महिलांनी मोर्चा काढला. तर महत्त्वाच्या जबाबदारीवरून रॉय यांना हटविण्यात आल्याने मुंबई पोलीस दलातूनही आश्चर्य व्यक्त होत आहे.
रॉय राज्य दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख होते. त्यांची बदली पोलीस गृहनिर्माण-कल्याण महामंडळावर करण्यात आली आहे. एटीएसचा पदभार स्वीकारल्यानंतर वर्षभरातच त्यांना या पदावरून हटविण्यात आले. पोलीस दलातून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांनुसार रॉय यांच्या कार्यकाळात मुंबईसह राज्यात कोठेच एकही दहशतवादी कारवाई घडली नाही. केंद्रीय गुप्तहेर संघटना आणि अन्य राज्यातल्या दहशतवादविरोधी यंत्रणांसोबत एटीएसचा समन्वय निर्माण करण्यात रॉय यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही घडी नीट बसलेली असताना सर्वकाही सुरळीत असताना त्यांना बदलून त्याजागी नवा अधिकारी आणण्याची काहीच आवश्यकता नव्हती. रॉय यांच्याजागी नियुक्त झालेल्या नव्या अधिकाऱ्याला (विवेक फणसाळकर) एटीएसचे काम समजावून घ्यायला बराच वेळ लागेल. एटीएसची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी रॉय मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख होते. त्या कार्यकाळात दहशतवादाशी संबंधित कारवाया, खटल्यांचे कामकाज सुरू होते. त्यामुळे रॉय यांना दहशतवादाबद्दलचा अभ्यास होता.
दरम्यान, सिंगल यांना बढतीवर रेल्वे पोलीस आयुक्तपदावरून विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. रेल्वे पोलीस आयुक्त म्हणून त्यांना फक्त सातच महिन्यांचा काळ मिळाला. त्यातही त्यांनी गुन्हेगारी कमी करण्यावर भर देतानाच महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले. त्यासाठी निर्भया पथकाची स्थापना केली. तसेच निर्भया व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन, फेसबुक अकाउन्टही सुरू केले. महत्त्वाची बाब म्हणजे बेवारस मृतदेहांना वारस मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘शोध’ या वेबसाइटला चालना दिली. या वेबसाइटला राज्य शासनाकडून यंदा ६ लाखांचा पुरस्कारही प्राप्त झाला. रेल्वे पोलिसांच्या आरोग्यासाठीही त्यांनी विशेष उपक्रम राबवले. कमी कालावधीत भरीव कामगिरी करणाऱ्या सिंगल यांची झालेली बदली जनतेला झोंबली. मंगळवारी सकाळी घाटकोपर येथील रेल्वे पोलीस वसाहतीजवळ स्थानिक महिलांनी मोर्चा नेत सिंगल यांचा कार्यकाळ वाढवा, अशी मागणी केली. त्यांच्या बदलीमुळे प्रवासी संघटनांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

दोन सहआयुक्तांमुळे संभ्रम
च्भाजपा सरकारने आर्थिक गुन्ह्यांना चाप लावण्याच्या इराद्याने गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागासाठी सहआयुक्त पदाची निर्मिती केली. त्यामुळे हा विभाग आयुक्तांच्या थेट देखरेखीखाली आर्थिक गुन्हे विभाग स्वतंत्रपणे काम करेल. मात्र या नव्या घडमोडीमुळे महिनाभरात होऊ घातलेल्या सर्वसाधारण बदल्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी चर्चा पोलीस दलात आहे.
च्याआधी बदलीच्या आदेशात संबंधित अधिकाऱ्याच्या नावासमोर बृहन्मुंबई, गुन्हे असे लिहिले जाई. भविष्यातल्या बदल्यांमध्येही असेच लिहिले गेले, तर कोणते अधिकारी गुन्हे शाखेकडे घ्यायचे आणि कोणाला आर्थिक गुन्हे विभागात सामावून घ्यायचे यावरून दोन सहआयुक्तांमध्ये रस्सीखेच होऊ शकेल. मात्र जर नव्या आदेशांमध्ये आर्थिक गुन्हे विभाग, असे स्पष्ट केल्यास संभ्रम निर्माण होण्याचा प्रश्न उदभवणार नाही.

Web Title: Women's Front Against Police Replacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.