स्त्रीने आत्मसन्मानाने जगावे
By Admin | Updated: March 7, 2015 22:28 IST2015-03-07T22:28:51+5:302015-03-07T22:28:51+5:30
स्त्रीने अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठविला पाहिजे. आपल्यातील न्यूनगंड काढून आत्मसन्मानाने जगायला शिकले पाहिजे,

स्त्रीने आत्मसन्मानाने जगावे
अलिबाग : स्त्रीने अन्यायाविरुद्ध नेहमीच आवाज उठविला पाहिजे. आपल्यातील न्यूनगंड काढून आत्मसन्मानाने जगायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केले. शनिवारी अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटी मुख्यालयाच्या सभागृहात आयोजित तेजस्विनी पुरस्कार वितरण समारंभात महाजन बोलत होत्या. महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते, पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील कार्यक्र माला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
सुनीता गायकवाड, वीणा शेटे, अश्विनी वास्कर, ललिता बंगेरा, लतिका गुरव यांना यावेळी तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महाजन म्हणाल्या, मुलगी नको असे म्हटल्याने केवळ त्या कुटुंबावर नव्हे तर समाजावर त्याचा परिणाम होतो. समाजाचा समतोल बिघडतो. याचा विचार स्त्रीने करावा. काही लोकांमधील विकृतीमुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. ही विकृती घालविण्यासाठी स्त्रीने आपल्या मुलांमध्ये मुलगा वा मुलगी असा भेद न करता त्यांना समान वागणूक द्यावी. मुलांवर चांगले संस्कार करावेत. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका पाहत न बसता आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचा देखील अभ्यास करावा.
स्त्री सक्षम झाली तर माणुसकी सक्षम होईल. स्त्रीने आपल्यातील क्षमता ओळखून काम केले पाहिजे. विकृतीवर संस्कृतीने मात केली पाहिजे, असे मत महाडच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी व्यक्त केले. स्त्रीने स्वत:कडे सहानुभूतीने पाहू नये. सहानुभूती स्त्रीला मागे नेते. आपण जसा विचार करतो तसे घडते. त्यामुळे स्त्रीने सकारात्मक विचार करावा, असे पी.एन.पी. एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
पुरस्कारप्रात्प सुनीता गायकवाड, वीणा शेटे, अश्विनी वास्कर, ललिता बंगेरा, लतिका गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर यांनी प्रास्ताविक केले.
पनवेल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयात रविवार, ८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता महिला सबलीकरण या विषयावर बी.एड्. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास वाचनालयाच्या सर्व सभासदांनी हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष अनंत सिंगासने व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख जयश्री शेट्ये यांनी केले आहे.