Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री पार्क बस थांब्यावर महिलांची सुरक्षा वाऱ्यावर; पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2025 12:31 IST

बाहेरून ज्या एसटी मुंबईत दाखल होतात, त्यातील बहुतांश एसटी चेंबूर, मैत्री पार्क येथे थांबतात.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मैत्री पार्कपासून (चेंबूर) कुर्ला स्टेशनला येण्यासाठी दोनशे रुपये भाडे आकारले जाते. या परिसरात रात्री एक वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत रिक्षाचालक सोडले तर येथे कोणी दर्शनास येत नाही. मुळात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दुल्ले असतात रस्त्याच्या बाजला पडलेल्या नशेखोरांकडून महिला प्रवाशांना धोका आहे. त्यामुळे येथे रात्री पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी महिला प्रवाशांकडून होते असते; परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून सुरक्षेच्या मुद्याकडे पाहिले गेलेले नाही.

बाहेरून ज्या एसटी मुंबईत दाखल होतात, त्यातील बहुतांश एसटी चेंबूर, मैत्री पार्क येथे थांबतात. या एसटीतून रात्री एकट्या प्रवास करणाऱ्या महिला मैत्री पार्क येथे उतरतात. येथे उतरल्यानंतर रिक्षा चालक आपल्याला प्रवासी मिळावे म्हणून एसटीमधून उतरलेल्या प्रवाशांना गराडा घालतात. या व्यतिरिक्त अव्वाच्या सव्वा भाडे मागतात.

रात्री एक वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत मैत्री पार्क येथे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जाते. याबद्दलही प्रवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या; परंतु आजही परिस्थिती 'जैसे थे'च असल्याचे पाहायला मिळत आहे.

एसटी महामंडळाने अत्याधुनिक सीसीटीव्हीसह विशेष सुरक्षा प्रणाली विकसित करण्यावर भर देणे गरजेचे आहे. मद्यपी, गर्दुल्ल्यांमुळे प्रवाशांना कधीही धोका निर्माण होऊ शकतो, याकडे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. - हरीश मुने, घाटकोपर

चेंबूर मैत्री पार्क बस थांबा म्हणजे नशेखोर लोकांचा अड्डा बनला आहे. बाजूलाच भुर्जीपाव व बिर्याणी ठेल्यावर दारू विकली जाते. तिथेच रिचवली जाते. नेहरुनगर बस स्टँडमध्ये रात्री अपरात्री रिक्षा आतपर्यंत येतात. सुरक्षारक्षकाचा अभाव असून महिला प्रवाशांच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली नाही.- निशांत घाडगे, कुर्ला 

टॅग्स :एसटी