मुंबई : सीएएविरोधात नागपाडा येथे रविवार रात्रीपासून सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनाला सर्व स्तरातून वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे. हा कायदा मागे घेर्ईपर्यंत आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलनकर्त्या महिलांनी केला आहे. मुंबईच्या विविध भागांतून या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने येऊ लागल्याने येथे मोठी गर्दी होऊ लागली आहे.नागपाडा पोलिसांनी मंगळवारी सकाळी महिलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, मात्र महिला त्यांच्या आंदोलनाच्या निर्धारावर ठाम आहेत. सीएए व एनआरसीविरोधातील आंदोलनात सुरुवातीपासून सहभागी असलेल्या सिनेअभिनेत्री कोंकणा सेन शर्मा यांनी मंगळवारी नागपाडा येथील आंदोलनाला भेट दिली व महिलांसोबत काही काळ आंदोलनात सहभाग घेतला. हा अन्यायकारी कायदा सरकारने मागे घ्यावा व नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी सेन यांनी केली. महिलांनी कायद्याविरोधात घोषणाबाजी करून आपला निषेध नोंदवला.
सीएएविरोधात नागपाड्यातील महिलांचे आंदोलन सुरूच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 01:44 IST