पाण्यासाठी महिलांची पंचायतीवर धडक
By Admin | Updated: October 9, 2014 22:44 IST2014-10-09T22:44:58+5:302014-10-09T22:44:58+5:30
काराव (गडब) ग्रामपंचायतीला जे. एस. डब्लू. स्टील कंपनीच्या पाइप लाइनवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथून होणारा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे.

पाण्यासाठी महिलांची पंचायतीवर धडक
वडखळ : गडब गावातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गडब येथील महिलांनी २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेत पाणी प्रश्नावरून सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना धारेवर धरत पाच दिवसात पाणीप्रश्न न सुटल्यास ग्रामपंचायत काराव (गडब) च्या सरपंच व सदस्यांच्या राजीनाम्याचा ठराव घेतला होता, परंतु पाच ते सहा दिवस उलटूनही पाणीप्रश्न सुटला नसून व कोणतीच उपाययोजना ग्रामपंचायतीने न राबविल्याने गावातील महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देऊन सरपंचाच्या राजीनाम्याची मागणी केली.
काराव (गडब) ग्रामपंचायतीला जे. एस. डब्लू. स्टील कंपनीच्या पाइप लाइनवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथून होणारा पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीप्रश्नाला सामोरे लागत आहे. या पाणी टंचाईबाबत शेकडो महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक देऊन सरपंचाच्या राजीनाम्याची मागणी केली, तर पाणीटंचाईबाबतच्या उपाय योजनांची माहिती मागविली. जॉन्सन कंपनीही ग्रामपंचायत हद्दीत येत असून या कंपनीतूनही गावाला पाणीपुरवठा करण्याची मागणी महिलांनी केली, तर येथील कंपन्यांतून होणाऱ्या प्रदूषणाबाबत या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
या वेळी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी सांगितले की, या पाणी पुरवठ्याची मागणी कंपनीकडे केली असून पाइपलाइन फुटल्याने तिच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी सरपंच जमुना वाघमारे, उपसरपंच नरेश मोकल,सदस्य संजय पाटील, तुलशीदास कोठेकर, नारायण मोकल, सदस्या प्रगती चवरकर, मंदा कडू, वैशाली मोकल, भारती कोठेकर, सरिता पाटील, कविता कोठेकर आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. गडब गावाला जे. एस. डब्लू. स्टील कंपनीकडून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याने व ग्रामपंचायत ठोस उपाययोजना करीत नसल्याने येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामसभा घेऊन पुढील रणनीती ठरविण्याचा निर्णय या वेळी महिलांनी घेतला. (वार्ताहर)