समाजोपयोगी उपक्रमांसाठी झटणाऱ्या महिला
By Admin | Updated: April 15, 2015 00:15 IST2015-04-15T00:15:54+5:302015-04-15T00:15:54+5:30
समाजातील दुर्बल घटकांना उन्नतीच्या मार्गावर आणण्यासाठी दहिसर येथील महिला सक्रिय आहेत.

समाजोपयोगी उपक्रमांसाठी झटणाऱ्या महिला
मुंबई : समाजातील दुर्बल घटकांना उन्नतीच्या मार्गावर आणण्यासाठी दहिसर येथील महिला सक्रिय आहेत. ‘इनरव्हील’ क्लबच्या माध्यमातून सक्रिय सदस्य असलेल्या या ३० महिलांनी पालघर येथील आदिवासी दुर्गम भागात अनेक समाजोपयोगी कार्य केल्याचे अध्यक्षा राखी सुनील आणि सदस्या सिंधू नायर-चौधरी यांनी ‘लोकमत’ व्यासपीठावर सांगितले.
‘इनरव्हील’तर्फे अंध विद्यार्थ्यांच्या शाळेला वह्या, पुस्तके, वॉटर बॉटल असे शालेय साहित्य दिले. याचबरोबर आदिवासी कन्या छात्रालयात राखी तयार करण्याची कार्यशाळा देखील भरवली. तसेच तांबे शाळेतील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरून त्यांचे शिक्षण सुरू ठेवले आहे. एका अपंग विद्यार्थ्याच्या शाळेत दरवर्षी दिवाळीत ध्वनिरहित फटाके फोडतात, जेणेकरून ध्वनिप्रदूषण कमी होण्यास मदत होते. या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पोटर््स कार्निव्हल’देखील घेण्यात आला.
‘इनरव्हील’चे मुंबईत एकूण ६५ क्लब आहेत. नरिमन पाइंटपासून पालघर, डहाणू, बोईसरपर्यंत हा विस्तार आहे. काही मोठे उपक्रम सर्व क्लब एकत्रितपणे करतात. ‘चेक डॅम’ उपक्रम ठाणे जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत बांधण्यात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी वाडा भागातील आदिवासी शाळेत ८ शौचालय बांधण्यात आली. येथील शाळेत सातशेहून अधिक विद्यार्थी आहेत, मात्र फक्त १-२ शौचालये होती. म्हणून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही शौचालये बांधण्यात आली.
मे महिन्यात रक्तदान शिबिर, महिलांना स्वसंरक्षणाची कार्यशाळा, यवतमाळमध्ये श्लोका मिशनरीजच्या एका शाळेत ६० बाके देणगी म्हणून देणार आहेत. तसेच रिक्षामध्ये लहान कचऱ्याचा डबा बसवण्यात येणार आहे, जेणेकरून रिक्षातून प्रवास करताना रस्त्यावर कचरा फेकला जाणार नाही.
या क्लबतर्फे दरवर्षी ‘बॅन प्लास्टिक’ जनजागृती अभियान राबविले जाते. भाजी-फळ विक्रेत्यांना प्लास्टिक पिशवी ग्राहकांना देऊ नका, असा सल्ला दिला जातो. तसेच दहिसरच्या व्यावसायिक केंद्रात टेलरिंंग, मेहंदी, कॉम्प्युटर क्लासही अगदी कमी शुल्कात शिकवले जातात.
‘स्पर्श’ हा शालेय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारा उपक्रम पालिका शाळेत राबवताना अनेकदा अडचणी येतात. या उपक्रमात विद्यार्थ्यांना कोणता स्पर्श चांगला व वाईट हे गोष्टीरूपात सांगितले जाते. मात्र पालिका शाळांमध्ये सहजासहजी हे करता येत नाही. त्यामुळे इतर खासगी शाळांमध्ये हा उपक्रम राबविणे अधिक सोयीचे होते.
तरुणींसाठी विशेष ‘रुबेला लसीकरण’विषयी जागृती करण्यात येणार आहे. महिलांना विवाहाआधी किंवा लग्न झाले असल्यास मूल होण्याआधी ही लस घेणे आवश्यक असते. यामुळे जन्माला येणारे मूल निरोगी असते. अनेक महिला गटांसाठी हे कार्य स्फूर्तिदायक असेच आहे. (प्रतिनिधी)