Join us

शौचालयाविना महिलांची होतेय कुचंबणा; मरिन लाइन्स, चिराबाजार, गिरगावात अत्यल्प प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 18:36 IST

महानगरी मुंबईत दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांना अत्यंत मूलभूत गरज असलेल्या शौचालयांची वानवा जाणवतेच आहे.

मुंबई

महानगरी मुंबईत दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. त्यांना अत्यंत मूलभूत गरज असलेल्या शौचालयांची वानवा जाणवतेच आहे. पालिका आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक शौचालये वापरात असली तरी महिलांसाठी काही मोजकीच शौचालये असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होते. 

मुंबईत दर एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ८५३ इतके असले तरी दर ४ सार्वजनिक शौचालयांतील केवळ एक शौचालय महिलांसाठी आहे. अशी माहिती प्रजा फाऊंडेशनने दिली. तर सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या ७५२ तर स्त्रियांची संख्या १८२० इतकी आहे. मात्र, स्वच्छ भारत अभियानानुसार एका शौचालयामागे वापरकर्त्यांचे प्रमाण पुरुषांसाठी १०० ते ४०० असून स्त्रियांसाठी १०० ते २०० इतके आहे जे पाळले जात नाही. 

स्वच्छता आणि देखभालमुंबई शहर आणि उपनगरांत पालिकेची ७३१५ सार्वजनिक शौचालये आहेत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुंबईत ८७७ शौचालयांचे व्यवस्थापन बघितले जाते. ही शौचालये नागरिकांना सशुल्क वापरता येतात. म्हाडाच्या अखत्यारितील ४९६ शौचालये पालिकेला हस्तांतरित केल्याची माहिती पालिकेचे उपजनसंपर्क अधिकारी मिलिंद बाफना यांनी दिली. 

रहदारीच्या भागात शौचालयेच नाहीत दक्षिण मुंबईत कामानिमित्त हजारो महिला येतात. मात्र, तिथली परिस्थिती बिकट आहे. मरिन लाइन्स, चिरा बाजार, गिरगाव, बोरीबंदरमध्ये हे प्रमाम फारच व्यस्त असून पुरुषांच्या ६ सार्वजनिक शौचालयांमागे स्त्रियांसाठी केवळ १ शौचालय आहे. असे म्युनिसिपल मजदूर युनियनच्या चिटणीस प्रफुल्लता दळवी यांनी म्हटले. 

शौचालयात पाणी, वीज नाही- मुंबईत एका सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या ८६, तर स्त्रियांची संख्या ८१ आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या निकषांनुसार एका शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या ३५ आणि स्त्रियांची संख्या २५ असायला पाहिजे. - मुंबईत सध्या उपलब्ध सार्वजनिक शौचालयांची संख्या अत्यल्प असून ती स्वच्छ भारत अभियानाच्या मापदंडांनुसार केवळ एक तृतीयांश झोपडपट्टीवासीयांना पुरतील इतकीच आहेत. - मुंबईतील एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी ६९ टक्के शौचालयांमध्ये पाण्याची नळजोडणी नाही, तर ६० टक्के शौचालयांत वीजच नसल्याचे प्रजा फाऊंडेशनचे म्हणणे आहे. - मुंबईची ही स्थिती चिंताजनक असल्याचे प्रजा फाऊंडेशनने सांगितले. 

टॅग्स :मुंबई