Join us  

संजय राऊत यांनी माझ्यावर पाळत ठेवली, फोन टॅप केले; महिलेची हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 5:45 AM

२०१८ मध्ये वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवूनही पोलिसांनी अद्याप तपास केलेला नाही. राऊत आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे वाकोला पोलिसांना नोंदवलेल्या तक्रारीवर तपास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्तीने याचिकेद्वारे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात एका महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. संजय राऊत गेले कित्येक वर्षे पाळत ठेवून आहेत. त्यांच्या माणसांनी आपल्यावर दोनदा हल्ला केला. तसेच राऊत यांनी रजनी पंडित हिच्या मदतीने आपले फोन टॅप केले, असे आरोप संबंधित महिलेने याचिकेद्वारे केले आहेत.

यासंदर्भात २०१८ मध्ये वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवूनही पोलिसांनी अद्याप तपास केलेला नाही. राऊत आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे वाकोला पोलिसांना नोंदवलेल्या तक्रारीवर तपास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्तीने याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी ठेवली आहे. याचिकाकर्त्या या सायकॉलॉजिस्ट, लेखक आहेत. त्यांनी केलेल्या याचिकेनुसार, संजय राऊत यांनी त्यांचा ध्यास घेतला आहे. त्यामुळे  त्यांची माणसे गेले कित्येक वर्षे त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत. तसेच राऊत यांच्या माणसांनी दोनदा त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांना मदत करणाऱ्या लोकांना धमकावून किंवा त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्यापासून दूर केले. इतकेच नव्हे तर त्यांच्या पतीच्या मदतीने त्यांची छळवणूकही केली.

या सर्व प्रकाराबद्दल २०१३ मध्ये माहीम पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मात्र, त्यांनी तपास केला नाही.  तर  दुसऱ्यांदा करण्यात आलेल्या हल्ल्याबाबत वाकोला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. त्याचाही तपास नीट करण्यात आला नाही. या सर्व कालावधीत आपल्या खासगी आयुष्य जगण्याच्या अधिकारावर गदा आणण्यात आली. असा आरोप याचिककर्तीने केला आहे.

टॅग्स :संजय राऊत