शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू
By Admin | Updated: March 5, 2015 01:54 IST2015-03-05T01:54:39+5:302015-03-05T01:54:39+5:30
सार्वजनिक शौचालयाचा कोबा खचल्याने ५० वर्षीय महिला टाकीत पडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात घडली.

शौचालयाच्या टाकीत पडून महिलेचा मृत्यू
मुंबई : सार्वजनिक शौचालयाचा कोबा खचल्याने ५० वर्षीय महिला टाकीत पडली. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी पहाटे सहाच्या सुमारास मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात घडली. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या चौकशीतून या अपघाताला जबाबदार कोण, हे निष्पन्न होणार आहे.
कल्पना पिंपळे (५०) असे या मृत महिलेचे नाव आहे. कल्पना महाराष्ट्र नगरातील साईबाबा चाळीत राहत होत्या. बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास चाळीजवळील सुलभ शौचालयात गेल्या. त्याचवेळी शौचालयाचा कोबा खचला. त्यामुळे कल्पना शौचालयाच्या टाकीत पडल्या.
सुरुवातीला या अपघाताबाबत कल्पना यांच्या कुटुंबीयांसह चाळीतल्या कोणालाही माहिती नव्हती. सुमारे अर्ध्या तासाने चाळीतली एक तरुणी शौचालयाकडे आली तेव्हा हा प्रकार उघड झाला. कोबा खचल्याची बाब तिनेच शौचालय चालक आणि चाळीतल्या रहिवाशांना दिली. तेव्हा या अपघातात कल्पना टाकीत पडल्याचे समजले. त्यानंतर अग्निशमन दलाला बोलावण्यात आले आणि बचावकार्य सुरू झाले.
अग्निशमन दल, पालिका कर्मचाऱ्यांनी कल्पना यांना
बाहेर काढले. तेव्हा त्या बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात
आले. मात्र तेथील डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित
केले. (वार्ताहर)
रहिवाशांकडून कारवाईची मागणी
सुमारे पाचेक वर्षांपूर्वी एका सामाजिक संस्थेने बांधा, वापरा या तत्त्वावर हे शौचालाय बांधले. मात्र शौचालयाचे काम अत्यंत निष्कृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवासी करीत आहेत. पोलिसांनी हे शौचालय बांधणाऱ्या कंत्राटदारावर तत्काळ कारवाई करावी, या मागणीसाठी रहिवाशांनी घोषणाबाजी करीत परिसर डोक्यावर घेतला.
पालिकेत पडसाद : या अपघाताचे तीव्र पडसाद बुधवारी महापालिकेच्या मुख्यालयात पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले़ सहा वर्षांपूर्वीच बांधलेले शौचालय खचले कसे, याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केली़ या प्रकणातील दोषींवर कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली़