मुंबई : म्हाडात एका महिलेने पैसे उधळल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी समिती स्थापन केली आहे. समितीने ११ अर्जदारांची पात्रता तपासून त्यांना संक्रमण शिबिरातील घरे देण्यासंबंधीचा अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले आहेत.
समिती स्थापन झाल्यामुळे याचा अहवाल लवकर प्राप्त होणार आहे. ११ अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर घरासंबंधी निर्णय घेण्यात यावा, असे आदेशही देण्यात आले आहेत.
विक्रोळी कन्नमवार नगर संक्रमण शिबिरातील चाळ क्रमांक १२, १३ व १४ या चाळींमधील घरे धोकादायक असल्याने पुनर्विकासासाठी चाळीतील घरांच्या बदल्यात इतर संक्रमण शिबिरात पर्यायी स्थलांतर देण्याच्या मागणीसाठी ११ अर्जदारांनी अर्ज केला.
अगोदर जुलै २०२०, मार्च २०२१, जून २०२१ व ऑक्टोबर २०२१ मध्ये कन्नमवार नगर विक्रोळी संक्रमण शिबिरातील जुन्या जीर्ण व धोकादायक चाळींमधील वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना जीवित हानी टाळण्यासाठी पुनर्विकास कार्यक्रमांतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या नवीन पुनर्रचित इमारतीत पात्र / अपात्रतेच्या अधीन राहून तात्पुरते स्थलांतरण देण्यात आले.
प्रकरण २० वर्षांपूर्वीचे
वीस वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असल्याने ११ अर्जदारांना नवीन संक्रमण शिबिर का दिले गेले नसावे ? याची पडताळणी होणे गरजेचे आहे. ही बाब धोरणात्मक असल्याने उपाध्यक्ष यांच्या स्तरावर आदेश होणे आवश्यक असल्याने प्रस्ताव पाठवण्यात आला.
अर्जांची पडताळणी गरजेची
सद्य:स्थितीला ११ अर्जदार हे धोकादायक व जीर्ण संक्रमण शिबिरातील घरांत राहत नाहीत. त्यामुळे प्रकरण हे धोरणात्मक असल्याने त्याला वरिष्ठांची मान्यता आवश्यक होती. पूर्वी संक्रमण शिबिरामध्ये घुसखोरांविरुद्ध मोहिमेअंतर्गत कार्यवाही करून शिबिरातील घुसखोरांना बाहेर काढण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अर्जदारांच्या अर्जाची पडताळणी करणे आवश्यक आहे.