Join us  

महिला वैमानिकाने वाचवले 261 प्रवाशांचे प्राण; प्रसंगावधान राखून टाळली विमानांची टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 10:47 AM

विस्तारा आणि एअर इंडियाच्या विरुद्ध दिशांना जाणा-या दोन विमानांची मुंबईजवळच्या आकाशात टक्कर होऊन होणारी संभाव्य भीषण दुर्घटना एका महिला वैमानिकामुळे टळली आणि 261 प्रवाशांचा जीव वाचला

मुंबई - विस्तारा आणि एअर इंडियाचं विमान बुधवारी एका मोठ्या दुर्घटनेतून बचावलं. विस्तारा आणि एअर इंडियाच्या विरुद्ध दिशांना जाणा-या दोन विमानांची मुंबईजवळच्या आकाशात टक्कर होऊन होणारी संभाव्य भीषण दुर्घटना एका महिला वैमानिकामुळे टळली आणि 261 प्रवाशांचा जीव वाचला. दोन्ही विमाने एकमेकांच्या अगदी जवळ आली होती. दोन्ही विमानात एकूण 261 प्रवासी प्रवास करत होते. एअर इंडियाच्या वैमानिक अनुपमा कोहली यांनी अत्यंत कुशलतेने परिस्थिती हातळली आणि प्रवाशांचा जीव वाचवला. विशेष म्हणजे यावेळी दोन्ही विमानांची जबाबदारी महिला वैमानिकांच्या हाती होती. 

चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, एअर ट्राफिक कंट्रोलर्सकडून संपर्क साधताना काहीतरी गफलत झाली होती. काही सेकंदांनंतर अत्यंत तणावपुर्ण परिस्थितीत वैमानिकांनी विमान आणि परिस्थितीवर ताबा मिळवला आणि संभाव्य दुर्घटना टळली. एअर इंडियाचं विमान A-319 मुंबईहून भोपाळच्या दिशेने तर विस्ताराचं A-320 विमान दिल्लीहून पुण्याच्या दिशेने प्रवास करत होतं. काही सेंकादांसाठी दोन्ही विमानं एकमेकांच्या अत्यंत जवळ आली होती, मात्र कोणतीही दुर्घटना झाली नाही.  ही दोन्ही विमाने परस्परांच्या ११० फूट एवढी धोकादायक जवळ आली होती व दैव बलवत्तर होते, म्हणूनच त्यातील २६१ प्रवाशांचे प्राण वाचले. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'काही सेकंदांच्या अंतरावर दोन्ही विमानं उडत होती. विस्ताराचं विमान 29 हजार तर एअर इंडियाचं विमान  27,100 फूट उंचीवर उडत होतं. एटीसी आणि विस्तारामध्ये संपर्क होत असताना काहीतरी गडबड झाली, त्यावेळी विमानाची जबाबदारी महिला वैमानिकाकडे होती. विमानातील प्रमुख वैमानिक यावेळी टॉयलेट ब्रेकवर होते. एअर इंडियाच्या विमानाची जबाबदारी महिला वैमानिक अनुपमा कोहली यांच्याकडे होती. दोन्ही महिला वैमानिकांनी देण्यात येणा-या सुचनांमुखे गोंधळाची परिस्थिती झाली असल्याचा अंदाज आहे'.

एअर इंडियाच्या वैमानिक अनुपमा कोहली यांच्याकडे विमान उडवण्याचा 20 वर्षांहून जास्त अनुभव आहे. विस्ताराचं विमान आपल्या दिशेने येत असल्याचं त्यांनी पाहिलं. आपल्या अनुभवाचा पूर्ण उपयोग करत त्यांनी परिस्थिती हाताळली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विस्ताराचं विमान आपल्या दिशेने येत असल्याचं पाहिल्यानंतर त्यांना रेड सिग्नल देण्यात आला. विस्ताराच्या महिला वैमानिकाने आपल्याला याच उंचीवर उडण्याचा आदेश देण्यात आल्याचं सांगितलं. अनुपमा कोहली यांनी विस्ताराचं विमान आपल्या दिशेने येत असल्याचं पाहिल्यानंतर आपलं विमान डाव्या बाजूला वळवत जागा करुन दिली. यावेळी त्यांनी आपलं विमान थोडं खाली नेलं. यामुळे दोन्ही विमानांची टक्कर टळली आणि प्रवाशांचा जीव वाचला'.एअर इंडियाने अनुपमा कोहली यांच्या निर्णय क्षमतेचं आणि कुशलतेने स्थिती सांभाळल्याबद्दल कौतुक केलं आहे.  

टॅग्स :एअर इंडिया