Join us
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण लॉकडाऊन आईच्या मृतदेहासोबत राहत होती मुलगी; मुंबईतील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 11:24 IST

शेजाऱ्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलीस घरी पोहोचल्यानंतर प्रकार उघडकीस

मुंबई: मुंबई पोलिसांना वांद्रे येथील घरात ८३ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मार्च महिन्यातच या महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र मृत महिलेच्या ५३ वर्षीय मुलीने याची माहिती कोणालाही दिली नाही. मुलगी गेल्या आठ महिन्यांपासून आईच्या मृतदेहासोबतच राहत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेच्या शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. 

महिलेची मुलगी घराच्या खिडकीतून कचरा फेकत असल्यानं शेजाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलीस मुलीच्या घरी  पोहोचले असता मुलगी संपूर्ण लॉकडाउनदरम्यान आपल्या आईच्या मृतदेहासोबत घरात राहत असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना समजली.

यानंतर पोलिसांनी शेजाऱ्यांकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी महिलेच्या मुलीची मानसिक स्थिती योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळेच मुलीनं आईच्या मृतदेहासोबत कोणाला माहिती दिली नसावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मुलीनं काही वर्षांपूर्वी तिच्या कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतरही अशाच पद्धतीनं कोणाला न कळवता घरात मृतदेह ठेवला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला. आईच्या मृत्यूसंबंधी विचारण्यात आलेले प्रश्न, मृत्यूचं कारण यासंबंधी काहीही उत्तर देऊ न शकल्यानं मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे.