Join us
Daily Top 2Weekly Top 5

'लोकल बॉय'; मुंबईच्या ट्रेनमध्ये महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 15:33 IST

कल्याण स्थानक सोडताच रुपाली यांच्या प्रसूती वेदना वाढल्या.

डोंबिवली : मुंबईतील खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये जिथे धड उभं राहायला जागा नसते तिथे गुरुवारी एका गरोदर महिलेने बाळाला जन्म दिला. नाशिकमध्ये राहणाऱ्या रुपाली आंबेकर बाळंतपणासाठी कल्याणच्या वाळधुनी येथे आपल्या माहेरी आल्या होत्या. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर येथील रुग्णालयात त्यांची प्रसूती होणार होती.काल रात्री 9 च्या सुमारास रूपाली यांच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे रूपाली यांचे वडील त्यांना घेऊन रुग्णालयात निघाले. त्यासाठी दोघांनी कल्याण येथून 9 वाजून 20 मिनिटांनी ट्रेन पकडली. मात्र, ट्रेनने कल्याण स्थानक सोडताच रुपाली यांच्या प्रसूती वेदना वाढल्या. काहीवेळातच त्यांनी ट्रेनमध्येच एका गोंडस बाळाला जन्म दिला. रुपाली यांनी बाळाला जन्म देईपर्यंत रेल्वे पोलिसांना याबाबत कळवण्यात आले होते. त्यामुळे ट्रेन डोंबिवली स्थानकात येताच पोलीस मदतीसाठी ट्रेनमध्ये चढले. रेल्वे पोलिसांनी तातडीने रूपाली आणि त्यांच्या बाळाला शास्त्रीनगर येथील पालिका रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर रुपाली आणि त्यांचे बाळ दोघेही सुखरुप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रूपाली यांना तातडीने रुग्णालयात नेणारे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल के. व्ही. राजपूत व डी. एल. जगदाळे या दोघांचे रुपाली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आभार मानले आहेत. 

टॅग्स :मुंबई लोकल