Join us

पंचतारांकित हॉटेलमध्ये महिला भाजली! ओव्हल शेफरचे गरम पाणी सांडून अपघात; व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल 

By गौरी टेंबकर | Updated: April 6, 2024 18:55 IST

... त्या ३१ मार्च रोजी सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास बुफे काउंटरवर ब्रेकफास्ट करण्यासाठी गेल्या. त्यांनी ओव्हल शेफरमधून ब्रेकफास्ट घेऊन तो बंद करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्याखाली ठेवलेले गरम पाणी हे त्यांच्या डाव्या बाजूकडील कमरेपासून मांडीवर पडले. त्यामुळे त्यांची कंबर आणि पाय भाजून त्यांना जखम झाल्या.

मुंबई: सहारच्या दी लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये एक महिला ग्राहक भाजली. ब्रेकफास्ट घेताना हा प्रकार घडला असून याप्रकरणी सहार पोलिसात तिने तक्रार दिल्यावर अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार डिंपल मेहता फर्नांडिस (३१) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्या ३० मार्च रोजी त्यांचे पती आणि अन्य दोन मित्रांसोबत सहार एअरपोर्ट रोड याठिकाणी असलेल्या द लीला या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायला गेल्या होत्या. त्या ३१ मार्च रोजी सकाळी १० ते १०.३० च्या सुमारास बुफे काउंटरवर ब्रेकफास्ट करण्यासाठी गेल्या. त्यांनी ओव्हल शेफरमधून ब्रेकफास्ट घेऊन तो बंद करण्याचा प्रयत्न केल्यावर त्याच्याखाली ठेवलेले गरम पाणी हे त्यांच्या डाव्या बाजूकडील कमरेपासून मांडीवर पडले. त्यामुळे त्यांची कंबर आणि पाय भाजून त्यांना जखम झाल्या. त्यानंतर लीला हॉटेलच्या स्टाफ सोबत त्या पतीला घेऊन हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी गेल्या. तिथल्या डॉक्टरने त्यांना उपचार करत घरी जायला सांगितले. त्यानंतर त्यांच्या फॅमिली डॉक्टर ताराबेन यांनी २ एप्रिल रोजी त्यांना तपासून होली स्पिरिट रुग्णालयात पाठवले. त्यानुसार त्या २ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी पती आणि आई ग्रीष्मा मेहता यांच्यासोबत होली स्पिरिट हॉस्पिटलला गेल्या. 

जिथे डॉक्टर नितीन घाग यांनी त्यांना तपासत आंतररुग्ण म्हणून दाखल करून घेतले आणि त्यांच्यावर सध्या तिथे उपाचार सुरू आहेत. हा सगळा अपघात लीला हॉटेल येथील व्यवस्थापनातील त्रुटी तसेच निष्काळजीपणामुळे घडला असल्याचा डिंपल यांचा आरोप आहे. त्यानुसार याविरोधात त्यांनी सहार पोलिसात तक्रार दिली आहे.

टॅग्स :हॉटेलपोलिस