महिलेचा मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:07 IST2021-01-21T04:07:40+5:302021-01-21T04:07:40+5:30
ठाणे : तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या पतीला जामीन मिळत नसल्याने तसेच आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने एका २९ वर्षीय महिलेने ...

महिलेचा मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न
ठाणे : तळोजा कारागृहात बंदिस्त असलेल्या पतीला जामीन मिळत नसल्याने तसेच आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने एका २९ वर्षीय महिलेने तिच्या दोन लहान मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला. मात्र, ठाणे रेल्वे सुरक्षा दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत महिला आणि तिच्या मुलींचा जीव वाचविला. महिलेचे समुपदेशन करून सोडून दिल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईतील अंधेरी भागात ही महिला राहते. तिचा पती कारागृहात आहे. न्यायालयीन कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी त्या मंगळवारी सकाळी दोन वर्षीय आणि १२ वर्षीय मुलीसह ठाण्यात आल्या होत्या. घरी परतत असताना दुपारी २.३० वाजेच्या सुमारास त्या ठाणे रेल्वे स्थानकात आल्या. त्यानंतर त्या फलाट क्रमांक २ येथील रेल्वे रुळांवर मुलींसह उतरल्या. याचदरम्यान मुंबईहून एक उपनगरीय रेल्वे याच रुळांवरून येत होती. ठाणे रेल्वे स्थानकात तैनात असलेले अंमलदार मुकेश यादव, पूजा आर्या यांचे लक्ष महिलेकडे गेल्याने त्यांनी तत्काळ रेल्वेतील मोटरमनला रेल्वेचा वेग कमी करण्याच्या सूचना हातवारे करून केल्या. त्यानुसार मोटरमनने रेल्वे थांबविली. त्यानंतर सुरक्षा दलाने महिला आणि तिच्या मुलींना रेल्वे रुळांवरून बाजूला केले.