अभिनेत्री झारा खानला धमकी देणाऱ्या महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:05 IST2020-12-25T04:05:22+5:302020-12-25T04:05:22+5:30
ओशिवरा पोलिसांची कारवाई मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सलमा आगा यांची कन्या अभिनेत्री व गायिका झारा खान हिला धमकी देणाऱ्या ...

अभिनेत्री झारा खानला धमकी देणाऱ्या महिलेला अटक
ओशिवरा पोलिसांची कारवाई
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सलमा आगा यांची कन्या अभिनेत्री व गायिका झारा खान हिला धमकी देणाऱ्या महिलेला बुधवारी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. नेहा सरवर (३९) असे धमकी देणाऱ्या महिलेचे नाव असून, ती खासगी मार्केटिंग कंपनीत काम करते. बॉलीवूडमधील अन्य काही सेलिब्रिटींनाही तिने अशाच प्रकारे धमकावल्याची माहिती असून, पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.
सोशल मीडियावरून शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची तक्रार झारा खानने ओशिवरा पोलिसांत दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपासाअंती हैदराबाद येथे राहणाऱ्या नेहाची माहिती मिळविली. तिला १९ डिसेंबर, २०२० रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली. मात्र ती हजर न झाल्याने तिला पुन्हा नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार बुधवारी ती ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर चाैकशीअंती तिला अटक करण्यात आली.
झारा खानसह तिने साहिल पीरजादे, कुशल टंडन, कमाल खान आणि एजाज खान यांनाही अशाच प्रकारे धमकावल्याचे तपासात उघड झाले आहे. ‘आरोपी महिलेने अशा प्रकारे बनावट आयडी बनवत आणखी काही लोकांना धमकावले आहे का?’ याबाबत चौकशी सुरू आहे,’ असे बांगर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
* ‘मेसेंजर ऑफ गॉड’साठी विरोध
नेहाने सोशल मीडियावर पुरुषांच्या नावे बनावट आयडी बनविले आणि त्यामार्फत धमकी देण्यास सुरुवात केली. झारा खान स्वतःला ‘मेसेंजर ऑफ गॉड’ (देवाचा संदेश देणारी) समजते, ज्याला नेहाचा विरोध होता. याच रागातून तिने हा प्रकार केल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
.....................................