रोपांअभावी ठाणे जिल्ह्यातील शतकोटी वृक्ष लागवडीला खो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2015 02:32 IST2015-07-07T02:32:10+5:302015-07-07T02:32:10+5:30
शतकोटी वृक्ष लागवडीचे आदेश दरवर्षाप्रमाणे या वर्षी राज्य शासनाने जिल्हा परिषदांना दिले आहेत. नरेगाद्वारे गाव, खेडे आदींसह विविध विभागांच्या माध्यमातून ही वृक्ष लागवड केली जात आहे.

रोपांअभावी ठाणे जिल्ह्यातील शतकोटी वृक्ष लागवडीला खो!
ठाणे : शतकोटी वृक्ष लागवडीचे आदेश दरवर्षाप्रमाणे या वर्षी राज्य शासनाने जिल्हा परिषदांना दिले आहेत. नरेगाद्वारे गाव, खेडे आदींसह विविध विभागांच्या माध्यमातून ही वृक्ष लागवड केली जात आहे. यानुसार, ठाणे जिल्ह्यात विविध विभागांकडून या वर्षी सुमारे १३ लाख ६२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन केले असले तरी जिल्ह्यातील कोणत्याच रोपवाटिकेमध्ये रोपे उपलब्ध नसल्यामुळे ठाणे जिल्हा परिषद क्षेत्रात या उपक्रमाला या वर्षी खो मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या वर्षी जिल्हा परिषदेच्या कोणत्याही रोपवाटिकेमध्ये रोपांची उपलब्धता नाही. तसेच अन्यही सरकारी रोपवाटिकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ते शिल्लक नाहीत. यामुळे या पावसाळ्यात या उपक्रमाला खीळ बसण्याची दाट शक्यता आहे. रोपे उपलब्ध होण्याची शाश्वती मिळत नसल्यामुळे अद्याप खड्डेही खोदलेले नाहीत. राज्यातील जवळपासच्या म्हणजे नाशिक, रायगड आदी जिल्ह्यातूनही रोपांची मागणी केली जात असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेच्या नरेगा कार्यालयातून सांगितले जात आहे.
राज्यातील अन्य जिल्ह्यात रोपे उपलब्ध झाल्यास झाडांच्या खरेदीपेक्षा त्यांच्या वाहतुकीवरच खर्च अधिक होणार आहे. खासगी रोपवाटिकांकडून रोपे खरेदी करण्याचे ठरविले तरी त्यांच्या किमती परवडणाऱ्या नाहीत. शिवाय, १३ लाख ६२ हजार रोपे त्वरित उपलब्ध होणेही शक्य नाही. त्यासाठी काही महिने आधीच आॅर्डर देणे गरजेचे असते. मात्र, याकडे कोणीही लक्ष दिले नसल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शतकोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम यंदा कदाचित कागदावरच राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)