मुंबई : मुंबईच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे मुंबईचा दहीहंडी उत्सव. यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी सगळे उत्सव आल्याने त्यांच्यावर निवडणुकीची छाप दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकारण्यांच्या लाखोंच्या हंड्या गोविंदा पथकांना आकर्षित करत आहेत.
महापालिकेच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यातच हिरवा कंदील दिला. मुंबईत दिवाळीनंतर निवडणुका होतील, असे राज्य निवडणूक आयोगानेच स्पष्ट केल्याने सर्व उत्सवांवर राजकीय प्रभाव दिसत आहे. राजकीय पक्षांमध्ये सर्वाधिक हंड्या भाजपप्रणित असल्याने पालिका निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याचे मानले जात आहेत. वरळीच्या जांबोरी मैदानात भाजपचे संतोष पांडे यांनी 'परिवर्तन दहीहंडी २०२५' नावाने उत्सवाचे आयोजन केले आहे. मानाच्या हंडीसाठी १,२१,१२१ रुपये आणि सन्मानाच्या दहीहंडीसाठी ९९,९९९ रुपये बक्षीस जाहीर केले आहे. याशिवाय ७ थर, ६ थर आणि ५ थरांसाठी अनुक्रमे ११ हजार, ७ हजार आणि ५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री आशिष शेलार या उत्सवाला भेट देण्याची शक्यता आहे.
मोठ्या बक्षिसांची स्पर्धा
वांद्रे हिल रोड परिसरात शिंदे सेनेचे शाखाप्रमुख अमोल काटे यांनी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची तयारी केली आहे. एक-एक लाखाची काही बक्षिसे येथे देण्यात येतील. याशिवाय परिसरातील दुकाने बंद असल्याने उत्सवाला भेट देणाऱ्यांसाठी अल्पोपहाराची सुविधा ठेवल्याचे काटे यांनी सांगितले.
परशुराम फाऊंडेशनतर्फे मनसेचे कलिना विभागप्रमुख संदीप हुटगी यांनी कुर्ला पश्चिम परिसरात दहीहंडीचे आयोजन केले आहे. त्यांनीही २१ लाखांची बक्षिसे देण्याची घोषणा केली आहे. राजकारण्यांमध्ये मोठ्या बक्षिसांच्या रकमेची स्पर्धा लागली आहे.